मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे डॉ. नरेंद्र दाभोलकरांचा वारसा चालवत आहेत, असे राष्ट्रवादी काँग्रेसच्या खा. सुप्रिया सुळे यांनी केलेले विधान दिशाभूल करणारे, चीड व संताप निर्माण करणारे आहे. डॉ. नरेंद्र दाभोलकर व देवेंद्र फडणवीस यांची तुलना होऊच शकत नाही. दोघांचा विचारांचा वारसा व मार्ग भिन्न आहेत, असे स्पष्ट करत खा. सुप्रिया सुळे यांनी त्यांचे विधान मागे घ्यावे, असे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी म्हटले आहे.

खा. सुप्रिया सुळे यांच्या विधानाचा समाचार घेत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ पुढे म्हणाले की, डॉ. नरेंद्र दाभोलकर यांनी अंधश्रद्धेचे निर्मूलन व्हावे, समाज जागरूक व्हावा यासाठी आयुष्य खर्ची घातले आणि ते कार्य करत असतानाच ते शहीद झाले. दाभोलकरांचा वारसा हा शिव, शाहू, फुले, आंबेडकरांचा, अंधश्रद्धा निर्मूलनाचा, सत्य व अहिंसेचा असून वारकरी संप्रदायाला पुढे नेणारा आहे. दाभोलकरांचे योगदान मोठे आहे. तर देवेंद्र फडणवीस यांचा मार्ग अंधश्रद्धेकडे नेणारा, पुरोगामी विचारांना बाजूला ठेवून प्रतिगामी विचारांना चालना देणारा, अंधश्रद्धेच्या खाईत ढकलणारा आणि भ्रष्टाचाऱ्यांना पाठीशी घालणारा आहे. त्यामुळे दोघांचा मार्ग एक असूच शकत नाही.

ज्यांनी शिवाजी महाराजांचा वारसा नाकारला, तुकारामांच्या गाथा बुडवल्या, त्यांचे वैचारिक वारसदार फडणवीस आहेत. क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांना विरोध करणारा वारसा फडणवीस पुढे नेत आहेत. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना काळाराम मंदिरात प्रवेश नाकारणाऱ्यांचा वारसा त्यांचा आहे. संविधान गुंडाळून ‘बंच ऑफ थॉट्स’ या संघाच्या विचारसरणीचा वारसा पुढे नेणारा विचार फडणवीस यांचा आहे, असेही सपकाळ म्हणाले.

हर्षवर्धन सपकाळ पुढे म्हणाले की, डॉ. नरेंद्र दाभोलकर हे मला भावासारखे आहेत. अंधश्रद्धा निर्मूलन कायद्याच्या मसुदा समितीचे अध्यक्ष ज्येष्ठ नेते एन. डी. पाटील होते, तर मी त्या समितीचा सदस्य होतो. खासदार सुप्रिया सुळे यांच्या वक्तव्यावर मी दुःख व खंत व्यक्त करतो. सुप्रिया सुळे यांना त्यांचे वडील शरद पवार यांच्या पुरोगामी विचारांचा तसेच ज्येष्ठ नेते एन. डी. पाटील यांच्या विचारांचा वारसा लाभलेला आहे. याची जाणीव व भान त्यांनी ठेवावे.

सुप्रिया सुळे चोर व संन्यासी दोघांना एकत्र दाखवत आहेत. त्यांचे वक्तव्य चीड व संताप निर्माण करणारे आहे. त्यावर त्यांनी खुलासा करून विधान मागे घ्यावे, असे आवाहन हर्षवर्धन सपकाळ यांनी केले आहे.