खेड : रत्नागिरी जिल्ह्यातील खेड शहरातील बसस्थानक परिसरात एका विकृत मनोवृत्तीच्या इसमाने मंगळवारी गोंधळ घालत कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण केल्याची घटना घडली. या इसमाने कर्तव्यावर असलेल्या दोन महिला होमगार्डना भर रस्त्यात शिवीगाळ करत त्रास दिल्यामुळे नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले.
प्रत्यक्षदर्शींच्या माहितीनुसार, संबंधित इसम बसस्थानक परिसरात अचानक आक्रमक झाला आणि तेथील महिला होमगार्डशी वाद घालत त्यांना अश्लील भाषेत शिवीगाळ करू लागला. या प्रकारामुळे काही काळ परिसरात गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली. नागरिकांनी या प्रकाराचा निषेध करत तातडीने पोलिसांना माहिती दिली.
दरम्यान, संबंधित इसमाने एवढ्यावरच न थांबता खेड पोलीस ठाण्याच्या आवाराबाहेर जाऊनही धमकी दिल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे परिस्थिती अधिक गंभीर झाली होती.
माहिती मिळताच खेड पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत संबंधित इसमाला ताब्यात घेत परिस्थिती नियंत्रणात आणली. या घटनेमुळे बसस्थानक परिसरात नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले होते.
पोलिसांकडून संबंधित इसमाविरोधात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून रात्री उशिरापर्यंत पुढील कार्यवाही सुरू होती.