दापोली, ता. २२ (वार्ताहर) : दापोली तालुक्यातील पर्यटनस्थळ म्हणून प्रसिद्ध असलेल्या मुरुड येथे आज रथोत्सव उत्साहात साजरा करण्यात आला. चैत्र शुद्ध प्रतिपदेपासून मुरुड येथील श्री दुर्गादेवी मंदिरात नऊ दिवस हा उत्सव साजरा केला जातो. याच उत्सवाचे औचित्य साधून रथयात्रेचे आयोजन केले जाते. यावेळी रथामध्ये दुर्गादेवीची प्रतिमा (रथपुतळी) ठेवून हा रथ गावामध्ये भक्तांच्या दर्शनासाठी खांद्यावरून फिरवला जातो.
या यात्रेसाठी पंचक्रोशीतील भक्तगण मोठ्या संख्येने उपस्थित असतात.
चैत्र महिन्यातील यात्रांची सुरुवात वेळास व मुरुड येथील श्री दुर्गादेवी, केळशी येथील श्री महालक्ष्मी, तसेच आंजर्ले येथील श्री दुर्गादेवी अशा क्रमाने होते. या सर्व यात्रांमधील रथोत्सवाला अनन्यसाधारण महत्त्व आहे.
