कुंभार्ली : सह्याद्रीच्या कुशीत रंगलेल्या अत्यंत रोमहर्षक आणि चित्तथरारक ‘किंग ऑफ कुंभार्ली 2026’ या राष्ट्रीय सायकलिंग स्पर्धेत यंदा देशभरातून जवळपास 400 स्पर्धक सहभागी झाले होते. चिपळूण सायकलिंग क्लबने आयोजित केलेल्या या प्रतिष्ठेच्या 5व्या पर्वात पुरुषांमध्ये धाराशिवच्या ईश्वर पाटीलने तर महिलांमध्ये पुण्याच्या श्रावणी परिटने विजेतेपद पटकावले.

विक्रमी वेळेत ‘घाटाचा राजा-राणी’
ईश्वर पाटील याने अवघ्या 01:01:13 या आजपर्यंतच्या विक्रमी वेळेत कुंभार्ली घाट सर करत ‘कुंभार्ली घाटाचा राजा’ हा मानाचा किताब मिळवला. महिलांमध्ये श्रावणी कृष्णात परिट हिने 1:26:34 वेळ नोंदवत ‘कुंभार्ली घाटाची राणी’चा मान पटकावला. प्रत्येक गटात अवघ्या काही मिलीसेकंदांच्या फरकाने क्रमांक बदलताना दिसले, यावरून स्पर्धेची चुरस लक्षात येते.

दिमाखात पारितोषिक वितरण
सकाळी 6 वाजता सावरकर मैदान, डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक येथून साहिल डेव्हलपर्सचे सचिन कदम व रत्नागिरी ट्रायथलीट क्लबचे संस्थापक अमित कवितके यांच्या हस्ते फ्लॅग ऑफ झाली. स्पर्धा कुंभार्ली घाट माथ्यावर संपल्यानंतर इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्रात पारितोषिक वितरण समारंभ पार पडला.

आमदार शेखरजी निकम यांच्या प्रमुख उपस्थितीत, अनिरुद्ध निकम, जयेंद्रशेठ खताते, दशरथ दाभोळकर, नितीन ठसाळे, मंगेश पेढांबकर यांच्या हस्ते विजेत्यांना गौरवण्यात आले. यावेळी प्रमुख देणगीदार सचिन कदम, विनती ऑरगॅनिक्सचे सुमेर तारे, कृष्णा केमिकल्सचे सुयोग चव्हाण, सारस्वत बँकेचे कल्पेश महाडीक आदी मान्यवर उपस्थित होते.

गटनिहाय निकाल :
*महिला मास्टर (36+)*: 1. अंजली भलिंगे (पुणे), 2. रुपाली गिरमकर (पिंपरी), 3. ब्लांशे थेमुडो (गोवा)
*महिला एलिट (16-35)*: 1. श्रावणी कृष्णात परिट (पुणे), 2. योगेश्वरी कदम (सांगली), 3. श्रावणी घोडेस्वार (कोल्हापूर)
*पुरुष किड्स (10-17)*: 1. आर्यन मालगे (कोल्हापूर), 2. आर्यन जाधव (पलूस), 3. साईराज भोईते (सातारा)
*पुरुष ज्येष्ठ (51+)*: 1. महेश किणी (ठाणे), 2. प्रशांत तिडके (पुणे), 3. संतोष पवार (पुणे)
*पुरुष मास्टर (35-50)*: 1. अनुप पवार (मुंबई), 2. संजीव कुमार शर्मा (दिल्ली), 3. श्रधीर शिरझेम (नोएडा)
*पुरुष खुला गट (18-35)*: 1. ईश्वर पाटील (धाराशिव), 2. निहाल नदाफ (सांगली), 3. सिद्धेश पाटील (कोल्हापूर)

स्पर्धकांच्या उत्स्फूर्त प्रतिसादामुळे भविष्यातील उपक्रमांसाठी हुरूप आल्याचे क्लब सदस्यांनी सांगितले.