कर्जत (प्रतिनिधी) : आखाती देशांतील युद्धाचे ढग दाटल्यामुळे इंधनाची टंचाई निर्माण होण्याची शक्यता व्यक्त होत असून, त्यामुळे जगातील अनेक देश संकटात सापडले आहेत. कर्जत तालुक्यात पेट्रोल संपणार असल्याची अफवा पसरली असून, त्यामुळे तालुक्यातील सर्व पेट्रोल पंपांवर दुचाकी चालकांनी मोठी गर्दी केली आहे. मात्र, याबाबत सर्व पेट्रोल पंप चालकांनी पेट्रोलचा साठा पुरेसा असून घाबरण्याचे कोणतेही कारण नसल्याचे स्पष्ट केले आहे.

कर्जत तालुका व शहर परिसरात पेट्रोल संदर्भात विविध अफवा पसरत असल्यामुळे नागरिकांमध्ये भीती व संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे. या अफवांच्या पार्श्वभूमीवर अनेक पेट्रोल पंपांवर मोठ्या प्रमाणात नागरिकांची गर्दी होत असून, परिस्थिती नियंत्रणाबाहेर जाण्याची शक्यता व्यक्त होत आहे. कर्जत तालुक्यातील सर्व पेट्रोल पंपांवर दुचाकी वाहनचालकांनी पेट्रोल भरण्यासाठी मोठी गर्दी केली आहे. काही पेट्रोल पंपांवर पेट्रोलचा साठा संपल्यामुळे पंप बंद ठेवण्यात आले आहेत, तर काही पंपांवर नागरिकांना फक्त ठरावीक रकमेपुरतेच पेट्रोल दिले जात आहे. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होत असून, काही ठिकाणी गोंधळाची परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. तसेच, वाढत्या गर्दीमुळे पेट्रोल चोरी होण्याची शक्यता देखील नाकारता येत नाही.

दरम्यान, कर्जत तालुक्यातील तीन पेट्रोल पंप व्यवस्थापनांनी सर्वत्र पुरेसा पेट्रोल साठा असल्याची माहिती दिली आहे. नेरळ सर्विस सेंटरचे बाळकृष्ण पादीर, कशेळे येथील भीमा पेट्रोलियमचे मालक तानाजी मते आणि कर्जत ऑटोमोबाईलचे चालक संतोष मते यांनी सर्वत्र पुरेसा साठा उपलब्ध असल्याने नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन केले आहे.

दरम्यान, सदर गंभीर परिस्थितीचा तात्काळ विचार करून खालीलप्रमाणे उपाययोजना कराव्यात, अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून करण्यात आली आहे. त्यात कर्जत तालुक्यातील सर्व पेट्रोल पंपांवरील गर्दी नियंत्रणात आणण्यासाठी उपाययोजना कराव्यात. नागरिकांमध्ये पसरलेल्या अफवांबाबत अधिकृत माहिती प्रसिद्ध करून संभ्रम दूर करावा. सर्व पेट्रोल पंप नियमितपणे सुरू राहतील यासाठी संबंधित यंत्रणांना सक्त सूचना द्याव्यात. पेट्रोल साठा व वितरण यावर नियंत्रण ठेवण्यासाठी विशेष पथक नेमावे. साठेबाजी, काळाबाजार व चोरी यांसारख्या प्रकारांवर तात्काळ व कडक कारवाई करावी, असे आवाहन प्रशासनाला करण्यात आले आहे.