लांजा: बोलेरो पिकअप वाहनातून दोन बैलांची बेकायदेशीररीत्या वाहतूक केल्याप्रकरणी लांजा पोलीस ठाण्यात एका तरुणालवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या कारवाईत पोलिसांनी वाहनासह २ लाख २१ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, शनिवार २२ ऑगस्ट रोजी सायंकाळी ७.१५ वाजण्याच्या सुमारास लांजा तालुक्यातील गोविळ बस स्टॉपजवळ ही कारवाई करण्यात आली. गणेश गणपत लांबोरे (वय २७, रा.वाडगाव रोड, कालभैरवनगर, धुंदरे, ता.लांजा, जि. रत्नागिरी) हा आपल्या ताब्यातील महिंद्रा बोलेरो पिकअप टेम्पोमधून (क्र.एमएच.०८.एपी.१२११) दोन बैलांची लांजा ते गोविळ रस्त्याने वाहतूक करत होता.
तपासणीदरम्यान, वाहनाच्या हौद्यात हवा खेळती राहण्यासाठी पुरेशी जागा न ठेवता तो चारही बाजूंनी बंदिस्त करण्यात आला होता. बैलांना हालचाल करता येऊ नये अशा प्रकारे आखूड दोरीने बांधून दाटीवाटीने कोंबण्यात आले होते. तसेच प्रवासात जनावरांना दुखापत होऊ नये म्हणून वाहनात कोणतेही पार्टीशन केले नव्हते. याशिवाय गुरांची वैद्यकीय तपासणी करून प्रमाणपत्र न घेणे, वाहनात चारा-पाण्याची किंवा प्रथमोपचार किटची व्यवस्था नसणे तसेच वाहनावर गुरे वाहतुकीचा फलक न लावता ही वाहतूक सुरू असल्याचे निष्पन्न झाले.

या कारवाईत पोलिसांनी सुमारे २ लाख रुपयांची बोलेरो पिकअप गाडी आणि प्रत्येकी १० हजार व ११ हजार रुपये किमतीचे दोन गावठी बैल असा एकूण २ लाख २१ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

याप्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल सुरज मौला नाईकवाडे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून आरोपी गणेश लांबोरे यांच्याविरुद्ध प्राण्यांचा छळ प्रतिबंधक अधिनियम १९६० चे कलम ११(१) (डी) (ई)(एफ), महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ चे कलम ११९, प्राण्यांची वाहतूक नियम १९७८ चे विविध कलम तसेच मोटार वाहन कायद्यानुसार लांजा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक तपास लांजा पोलीस निरीक्षक निळकंठ बगळे यांच्या मार्गदर्शनाखाली महिला हेडकॉन्स्टेबल उर्मिला शेडे करत आहेत.