पोलादपूर (शैलेश पालकर) : झीटिव्हीचे संचालक झैदी यांची कार कोसळलेल्या ‘दाभिळटोंक’ येथे डॉ.बाळासाहेब सावंत कृषी विद्यापीठाची बस कोसळली आणि आता त्याच ठिकाणी स्कॉर्पिओ गाडी कोसळली. स्कॉर्पिओ आणि कृषी विद्यापिठाच्या बस कोसळण्यामागे दोन्ही वाहने रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली येथून आल्याचा अनोखा योगायोग दिसून येत आहे.

रविवारी पहाटे 4 वाजण्याच्या सुमारास पोलादपूर तालुक्यातील आंबेनळी घाटातील ‘दाभिळटोंक’ येथील दरीत सुमारे 1200 ते 1500 फूट खोल दरीत कोसळून स्कॉर्पिओने पेट घेतला असण्याची शक्यता व्यक्त होत असून काळया रंगाची स्कॉर्पिओ साधारणपणे 80 टक्केहून अधिक पेट घेतल्यासारखी तांबडा रंगाचा पत्रा झालेली दरीतून प्राप्त ड्रोनफोटोंमध्ये दिसून आली. रविवारी रात्री साधारणपणे 10 वाजण्याच्या सुमारास या अपघाताचा सुगावा मोबाईल बंद झाल्याने लोकेशन द्वारे लागला. रात्रीच्या काळोखामुळे खोल दरीत उतरण्याचे धाडस आत्मघातकी असल्याने टाळण्यात आले आणि सोमवारी सकाळी 8 वाजता रेस्क्यूची सुरूवात झाल्याची माहिती प्राप्त झाली. सातारा जिल्हयातील 8 तरूण ठार झाल्याची माहिती अधिकृतपणे पोलादपूरचे सहायक पोलीस निरिक्षक आनंद रावडे यांनी प्रसिध्दी माध्यमांना दिली.