चिपळूण : वाचन संस्कृतीला चालना देण्याच्या उद्देशाने उभारण्यात आलेल्या विभा अरविंद ग्रंथालयाचे उद्घाटन रविवारी दि. २४ मे २०२६ रोजी सायंकाळी ५ वाजता उत्साहात संपन्न झाले. शहरातील खेंड येथील स्प्रिंग क्लिनिकच्या तळमजल्यावर, जेड गार्डन, स्वरविहार, गणपती मंदिराशेजारी हा कार्यक्रम पार पडला.
कार्यक्रमाचे उद्घाटन नगरसेवक अंकुश आवले यांच्या हस्ते व मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कृषीभूषण तानाजीराव चोरगे होते. यावेळी बोलताना त्यांनी वाचन संस्कृतीचे महत्त्व अधोरेखित केले. कितीही वाचनालये सुरू झाली तरी ती कमीच पडतील. प्रत्येक घराघरात वाचनाची आवड निर्माण होणे आवश्यक आहे. वाचन हे मेंदूचे अन्न असून त्यातून बुद्धिमत्ता विकसित होते असे ते म्हणाले.
कार्यक्रमाला जेष्ठ मार्गदर्शक प्रकाश देशपांडे, नगरसेविका नीलिमा जाधव, नगरसेविका राणी महाडिक, माजी आमदार रमेशभाई कदम, लोटिस्मा कार्याध्यक्ष अरुण इंगवले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर वाचनालयाचे अध्यक्ष राष्ट्रापाल सावंत, विभा अरविंद ग्रंथालयाचे अध्यक्ष प्रकाश काणे, उपाध्यक्षा डॉ. वैशाली जाधव, नगरसेवक अजय भालेकर, नगरसेवक निहार कोवळे, प्रसाद डमढेरे, प्रसाद रिसबूड, संतोष देशमुख, डॉ. यतिन जाधव यांच्यासह बहुसंख्य वाचनप्रेमी व नागरिक उपस्थित होते.
ग्रंथालयाचे अध्यक्ष प्रकाश काणे यांनी ग्रंथालयाच्या निर्मितीची माहिती उपस्थितांना दिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ. जोशी यांनी केले, तर आभार प्रदर्शन विजय कदम यांनी मानले.
