मुंबई : महाराष्ट्रातील अनेक भागांत गेल्या ४५ दिवसांपासून पावसाचा मोठा खंड पडल्याने खरीप पिके गंभीर संकटात सापडली आहेत. शेतकऱ्यांनी मोठा खर्च करून पेरणी केली; मात्र पावसाअभावी पिकांची वाढ खुंटली आहे. त्यामुळे सरकारने तातडीने कोरडा दुष्काळ जाहीर करून शेतकरी व शेतमजुरांना आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी वंचित बहुजन आघाडीचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष राजेंद्र पातोडे यांनी केली आहे. मागण्या मान्य न झाल्यास प्रत्येक जिल्ह्यात गुरे-ढोरे, कोंबड्या, बकऱ्या आणि बैलजोडीसह ‘बिऱ्हाड आंदोलन’ करण्याचा इशाराही त्यांनी दिला.
पावसाचा खंड आणखी वाढल्यास खरीप पिकांच्या उत्पादनात किमान ५० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता असून शेतकऱ्यांसमोर कर्जाचा बोजा आणि आर्थिक नुकसान असे दुहेरी संकट उभे राहिले आहे. बोगस बियाणे, पावसाचा खंड आणि पीक विम्याचे बदललेले निकष यामुळे शेतकऱ्यांच्या अडचणी आणखी वाढण्याची शक्यता असल्याचे पातोडे यांनी म्हटले आहे.
पीक विम्याचा हप्ता भरूनही कठोर निकषांमुळे शेतकऱ्यांना नुकसान भरपाईपासून वंचित राहावे लागू नये, याची शासनाने हमी द्यावी. प्रत्यक्ष उत्पादनातील घट लक्षात घेऊन विमा भरपाई देण्यात यावी, अशी मागणीही त्यांनी केली.
पावसाच्या तुटीने बाधित भागात तातडीने कोरडा दुष्काळ जाहीर करावा, पीक नुकसानीचे प्रत्यक्ष पंचनामे करावेत आणि संपूर्ण हंगामासाठी हेक्टरी भरीव आर्थिक मदत द्यावी. दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या पीक कर्जाची वसुली स्थगित करून कर्जाचे पुनर्गठन करावे, शेतकऱ्यांच्या मुलांची शैक्षणिक फी माफ करावी, अशी मागणी वंचित बहुजन आघाडीने केली आहे.
तसेच कृषी पंपांची वीज तोडणी थांबवून दिवसा आठ तास नियमित वीजपुरवठा करावा. पावसाअभावी रोजगार गमावलेल्या शेतमजुरांसाठी तातडीने रोजगार हमीची कामे सुरू करावीत. जनावरांसाठी चारा व पाण्याची व्यवस्था करावी, अशी मागणीही करण्यात आली आहे.
सरकारने केवळ पाऊस पडण्याची वाट न पाहता शेतकऱ्यांच्या नुकसानीची जबाबदारी तातडीने स्वीकारावी. शेतकरी आणि शेतमजुरांना तातडीने आर्थिक मदत मिळाली नाही, तर वंचित बहुजन आघाडीच्या नेतृत्वाखाली प्रत्येक जिल्ह्यात ‘बिऱ्हाड आंदोलन’ सुरू करण्यात येईल, असा इशारा राजेंद्र पातोडे यांनी दिला.