चिपळूण : कोकण स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या विधान परिषद निवडणुकीवरून महायुतीमध्ये रस्सीखेच सुरू असतानाच राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे आमदार शेखर निकम यांनी या जागेवर राष्ट्रवादी काँग्रेसचाच दावा असल्याचे स्पष्ट केले आहे. ही जागा पूर्वीपासून राष्ट्रवादी काँग्रेसकडे असून महायुतीच्या माध्यमातून ही जागा पक्षालाच मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण येथे प्रसारमाध्यमांशी बोलताना आमदार शेखर निकम यांनी कोकण स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाबाबत पक्षाची भूमिका स्पष्ट केली. ही जागा राष्ट्रवादी काँग्रेसची विद्यमान जागा असून यापूर्वी अनिकेत तटकरे हे या मतदारसंघातून सदस्य होते. त्यामुळे रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या तिन्ही जिल्ह्यांची ही जागा राष्ट्रवादी काँग्रेसलाच मिळावी, अशी आमची ठाम भूमिका असल्याचे त्यांनी सांगितले.

महायुतीतील वरिष्ठ नेते एकत्रित चर्चा करून योग्य निर्णय घेतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सुनेत्रा पवार यांच्या चर्चेतून राष्ट्रवादी काँग्रेसलाच ही जागा मिळेल, असेही निकम म्हणाले. दरम्यान, या जागेसाठी शिवसेनाही आग्रही असल्याने महायुतीत नेमका कोणता निर्णय होतो, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.