चिपळूण : “पाणी हेच जीवन आहे. आज पाण्याचा योग्य वापर केला आणि पाण्याचे संवर्धन केले, तरच उद्याचे भविष्य सुरक्षित राहील,” असा संदेश पंचायत समितीचे माजी सभापती व पर्यावरणप्रेमी शौकत भाई मुकादम यांनी दिला आहे. भविष्यातील पाणीटंचाईची गंभीर परिस्थिती लक्षात घेऊन त्यांनी चिपळूण तालुक्यात ‘थेंबे थेंबे पाणी वाचवा, उद्याचे भविष्य सुरक्षित करा’ हे जलसंवर्धन अभियान सुरू केले आहे.
भविष्यात पाण्याची टंचाई अधिक तीव्र होण्याची शक्यता असून, पाण्याचा प्रत्येक थेंब जपणे ही काळाची गरज बनली आहे. नदी-नाल्यांतून वाहून जाणारे पाणी कच्चे व पक्के बंधारे बांधून अडवावे आणि ते जमिनीत जिरवून भूजलपातळी वाढवावी, असे आवाहन शौकत भाई मुकादम यांनी केले आहे. वेळीच पाण्याचे नियोजन आणि संवर्धन केले नाही, तर भविष्यात गंभीर परिस्थितीला सामोरे जावे लागू शकते, असा इशाराही त्यांनी दिला.
या अभियानांतर्गत चिपळूण तालुक्यातील गावोगावी तसेच महाविद्यालयांमध्ये जलसंवर्धनाविषयी व्याख्याने आयोजित केली जात आहेत. दिनांक २२ ऑक्टोबर २०२६ रोजी सह्याद्री शिक्षण संस्थेच्या सती येथील महाविद्यालयातून या उपक्रमाची सुरुवात करण्यात आली. विद्यार्थ्यांना पाण्याचे महत्त्व, पाण्याचा काटकसरीने वापर आणि जलसंधारणाची आवश्यकता याबाबत मार्गदर्शन करण्यात येत आहे.
या कार्यक्रमाला माजी कृषी अधिकारी विनोद कुमार शिंदे, धवन गुरुजी, हायस्कूलचे मुख्याध्यापक वरेकर सर, पाटील सर, जगदाळे सर यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते.
चिपळूण तालुक्यातील बारा महाविद्यालयांमध्ये हे अभियान राबविण्याचे नियोजन करण्यात आले आहे. यासोबतच गावोगावी बंधारे बांधून पाणी अडविणे आणि ते जमिनीत मुरविण्यासाठीही पुढाकार घेण्यात आला आहे.
पाण्याचा प्रत्येक थेंब अनमोल आहे. आज पाणी वाचवले, तरच उद्या पाणी मिळेल. जलसंवर्धन ही केवळ एका व्यक्तीची किंवा संस्थेची जबाबदारी नसून, ती प्रत्येक नागरिकाची सामूहिक जबाबदारी आहे. शौकत भाई मुकादम यांच्या या अभियानातून जलसंवर्धनाची चळवळ अधिक व्यापक होण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.