चिपळूण : तालुक्यातील पेढांबे (विठ्ठलवाडी) येथे राहत्या घरात घुसून एका अज्ञात व्यक्तीने वृद्ध महिलेच्या गळ्यातील सोन्याचा हार हिसकावून चोरून नेल्याची घटना २२ नोव्हेंबर रोजी सायंकाळी साडेसहाच्या सुमारास घडली. या घटनेत तीन तोळे वजनाचा आणि अंदाजे १ लाख ८० हजार रुपये किमतीचा सोन्याचा हार चोरीस गेला आहे.
याप्रकरणी प्रदीप वसंत शिंदे (वय ४५, रा. पेढांबे, विठ्ठलवाडी, ता. चिपळूण) यांनी अलोरे-शिरगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. त्यांच्या आई शेवंती वसंत शिंदे यांच्या गळ्यातील सोन्याचा हार अज्ञात व्यक्तीने हिसकावून नेल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.
या प्रकरणी २३ नोव्हेंबर २०२६ रोजी अलोरे-शिरगाव पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक १४३/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता २०२३ च्या कलम ३०४ तसेच फिर्यादीत नमूद कलम ३९२ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
राहत्या घरातूनच सोन्याचा हार हिसकावून नेल्याने पेढांबे परिसरात या घटनेची चर्चा सुरू झाली आहे.