मंडणगड : कृषिप्रधान भारतात महसूल विभागामार्फत पिकांची अधिकृत अभिलेखात (७/१२) अचूक नोंद व्हावी, यासाठी डिजिटल स्वरूपात राबविण्यात येणाऱ्या राज्य शासनाच्या महत्त्वाकांक्षी ‘ई-पीक पाहणी’ प्रकल्पाने मंडणगड तालुक्यात मोठी गती घेतली आहे. तालुक्यातील खरीप तसेच बहुवार्षिक फळपिकांची नोंदणी ‘ई-पीक पाहणी सहाय्यक’ स्तरावरून युद्धपातळीवर सुरू असून, या मोहिमेत दाभट गावाने तालुक्यात सर्वप्रथम १०० टक्के ई-पीक पाहणी पूर्ण करण्याचा बहुमान मिळवला आहे, तर मुरादपूर गावाने तालुक्यात दुसरे स्थान पटकावले आहे.
शासनाच्या या डिजिटल उपक्रमाची प्रभावी अंमलबजावणी व्हावी, यासाठी मंडणगड तालुक्यात सहाय्यकांसाठी विशेष तालुकास्तरीय प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. केवळ कागदोपत्री काम न करता, महसूल प्रशासनाच्या पथकाने थेट शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन सहाय्यकांना ॲपच्या वापराबाबत प्रत्यक्ष प्रात्यक्षिक दाखवले. यासाठी मंडणगड, म्हाप्रळ, देव्हारे, वेसवी महसूल मंडळ स्तरावर सहाय्यक यांची प्रात्यक्षिक दाखविण्यात आले..
या मोहिमेच्या यशस्वीतेसाठी तहसीलदार अक्षय ढाकणे, मंडळ अधिकारी निलेश गोडघासे, ग्राममहसूल अधिकारी (तलाठी) हिरा ठोंबरे यांनी प्रत्यक्ष बांधावर जाऊन मार्गदर्शन केले. दाभट गावचे ई-पीक पाहणी सहाय्यक श्री. मुराद तांडेल आणि स्थानिक पोलीस पाटील यांच्या विशेष प्रयत्नांतून दाभट गावाने तालुक्यात प्रथम १००% उद्दिष्ट पूर्ण केले आहे. त्यापाठोपाठ मुरादपूर गावचे ई पिक पाहणी सहाय्यक श्रीम. नाझीमा खलपे, पोलिस पाटील मुरादपूर यांनी 100%उद्दिष्ट पूर्ण केले आहे..
शेतकऱ्यांना आवाहन:
पीक विमा, नैसर्गिक आपत्तीच्या काळात मिळणारी शासकीय भरपाई, पीक कर्ज आणि हमीभाव योजनांचा लाभ घेण्यासाठी सातबारावर पिकांची अचूक नोंद असणे बंधनकारक आहे. त्यामुळे तालुक्यातील उर्वरित गावांमधील सर्व शेतकरी बांधवांनी कोणत्याही मदतीसाठी आपल्या गावातील ई-पीक पाहणी सहाय्यक किंवा ग्राममहसूल अधिकाऱ्यांशी संपर्क साधून मुदतीत आपल्या खरीप व बहुवार्षिक पिकांची नोंदणी पूर्ण करून घ्यावी, असे आवाहन तहसीलदार अक्षय ढाकणे यांनी केले आहे.