चिपळूण : महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागांतर्गत संत ज्ञानेश्वर महाराजांच्या ७५०व्या जयंतीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या “ज्ञानभक्ती स्त्रीशक्ती – लोकसंस्कृती आणि सांस्कृतिक वैभव सोहळा” या विशेष सांस्कृतिक कार्यक्रमासाठी चिपळूणमध्ये दाखल झालेल्या राज्यातील नामवंत कलाकारांनी चिपळूणचे प्रसिद्ध श्री परशुराम देवस्थान येथे भेट देऊन दर्शन घेतले.

या वेळी देवस्थानच्या वतीने सल्लागार समितीतील मान्यवरांच्या उपस्थितीत निवेदक पंकज विष्णू, निवेदिका रश्मी आमडेकर, गायक ऋण्मयी फाटक, ओंकार बंडबे, मयुरा पालांडे, संजना पाटील, भाग्यश्री देवी यांच्यासह सहभागी कलाकारांचे स्वागत व सत्कार करण्यात आला. चिपळूणच्या वतीने तसेच श्री परशुराम देवस्थानच्या वतीने सर्व कलाकारांना त्यांच्या सांस्कृतिक प्रवासासाठी शुभेच्छा देण्यात आल्या.

देवस्थानच्या वतीने अभय सहस्रबुद्धे, प्रशांत पटवर्धन तसेच समीर देसाई यांच्या माध्यमातून कलाकारांचे स्वागत करण्यात आले. चिपळूणमध्ये आलेल्या या कलाकारांना येथील धार्मिक, सांस्कृतिक आणि ऐतिहासिक वारशाची ओळख करून देण्याचा हा विशेष प्रसंग ठरला.

या संपूर्ण भेटीच्या नियोजन व कलाकारांशी समन्वय साधण्यामध्ये अक्षय केदारी यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. चिपळूणच्या कला-सांस्कृतिक क्षेत्राशी सातत्याने संपर्क असलेल्या केदारी यांचे सहभागी कलाकारांशी असलेले स्नेहपूर्ण संबंध यावेळी दिसून आले. कलाकारांच्या आगमनापासून श्री परशुराम देवस्थान भेटीपर्यंत आवश्यक समन्वय साधत त्यांच्या सोयीची व वेळेची काळजी घेण्यात आली. श्री परशुराम देवस्थान येथे झालेल्या भेटीच्या नियोजनावेळी मनोहर खेडेकर हेदेखील उपस्थित होते व त्यांनी या नियोजनासाठी सहकार्य केले. त्यामुळे कलाकारांची भेट, स्वागत आणि देवस्थान दर्शनाचा कार्यक्रम आपुलकीच्या वातावरणात सुरळीतपणे पार पडला.

विशेषतः चिपळूणच्या मयुरा पालांडे यांचा या सांस्कृतिक सोहळ्यात सहभाग असल्याने या भेटीला स्थानिक सांस्कृतिक नात्याची विशेष जोड मिळाली. मयुरा पालांडे यांच्यासह सहभागी सर्व कलाकारांशी असलेल्या स्नेहपूर्ण वातावरणामुळे ही भेट औपचारिक न राहता आपुलकीच्या वातावरणात पार पडली.

चिपळूणची सांस्कृतिक ओळख, येथील कलाकारांशी असलेले स्नेहबंध आणि राज्यभरातून आलेल्या कलावंतांचे मनापासून स्वागत करण्याची परंपरा यांचा सुंदर संगम या भेटीत पाहायला मिळाला.