शिरगाव : तालुक्यातील गाणे-खडपोली परिसरात एक धक्कादायक घटना उघडकीस आली असून वणव्यात होरपळून एका ७० वर्षीय महिलेचा मृत्यू झाल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. तारामती तुकाराम वाघे असे मृत महिलेचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, तारा वाघे या चार पाच दिवसापासून बेपत्ता होत्या. याचदरम्यान गाणेच्या जंगलात चार दिवसापूर्वी वनवा लागला होता .आणि एक इसम जंगलातून लाकडाची फाटी आणण्यासाठी गेला होता. त्यावेळी त्याला एक मृतदेह जाळल्या स्थितीत दिसून आला .मात्र साडीवरून त्यांनी हा मृतदेह तारामती वाघे हिचा असल्याचं ओळख पटली. त्यानुसार त्यांनी अलोरे शिरगाव पोलिस यांना माहिती दिली .त्यानुसार पोलिस यांनी घटनास्थळी भेट दिली आणि सदरच्या मृतदेह यांच्यावर शिरगाव प्राथमिक आरोग्य केंद्रात शवविचेदनं करण्यात आले.
वणव्याच्या तीव्रतेमुळे त्या होरपळून मृत्यूमुखी पडल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.दरम्यान, या घटनेमुळे वणव्याच्या वाढत्या घटनांबाबत चिंता व्यक्त केली जात असून नागरिकांनी अधिक सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात येत आहे.