खेड : पाच दिवसांच्या गणपती बाप्पाला निरोप दिल्यानंतर आता चाकरमानी मुंबईच्या दिशेने परतीच्या प्रवासाला लागले आहेत. मात्र, परतीच्या प्रवासात चाकरमान्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. रेल्वे आणि एसटी बस फुल्ल झाल्या असून मुंबई-गोवा महामार्गावर वाहनांची प्रचंड गर्दी झाल्याने अनेक ठिकाणी वाहतूक कोंडी निर्माण झाली आहे. त्यातच सीएनजी पंपांवर गॅस भरण्यासाठी वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याने प्रवास रखडला आहे.
गणेशोत्सवासाठी कोकणात आलेल्या चाकरमान्यांनी विसर्जनानंतर मुंबईकडे परतीचा प्रवास सुरू केला आहे. खेड बसस्थानकावरून मुंबईच्या दिशेने सुटणाऱ्या एसटी बसेस प्रवाशांनी खचाखच भरल्या आहेत. त्यामुळे अनेकांनी रेल्वेचा पर्याय निवडला; मात्र तळकोकणातून मुंबईच्या दिशेने येणाऱ्या बहुतांश रेल्वे गाड्या आधीच प्रवाशांनी भरलेल्या असल्याने खेड रेल्वे स्थानकावरून गाडीत चढणेही प्रवाशांसाठी आव्हान ठरले.
रेल्वे स्थानकावर प्रवाशांची मोठी गर्दी झाल्याने रेल्वे पोलीस व होमगार्डच्या मदतीने प्रवाशांना गाडीत चढण्यासाठी दरवाजे उघडून देण्यात आले. मात्र, दरवाजांवर मोठ्या संख्येने प्रवासी लटकून उभे असल्याने आत प्रवेश करणे कठीण झाले. दिव्यांगांसाठी राखीव असलेल्या डब्यांमध्येही दाटीवाटीने प्रवासी बसल्याचे दिसून आले. त्यामुळे दिव्यांग प्रवाशांनाही गाडीत प्रवेश करताना अडचणींचा सामना करावा लागला. दरम्यान, मुंबई-गोवा महामार्गावरही परतीच्या प्रवासासाठी निघालेल्या वाहनांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. वाहनांच्या गर्दीमुळे अनेक ठिकाणी वाहतूक संथ झाली असून वाहनचालकांना रखडत प्रवास करावा लागत आहे. त्यातच सीएनजी भरण्यासाठी पंपांवर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. काही ठिकाणी गॅस भरण्यासाठी वाहनचालकांना तब्बल एक तासापेक्षा अधिक काळ प्रतीक्षा करावी लागत आहे.
रेल्वेची गर्दी, एसटी बसेसची फुल्ल स्थिती, महामार्गावरील वाहतूक कोंडी आणि सीएनजीच्या तुटवड्यामुळे चाकरमान्यांचा मुंबईकडे परतीचा प्रवास अक्षरशः खडतर झाला आहे. गणेशोत्सवाचा आनंद घेऊन परतणाऱ्या चाकरमान्यांना प्रवासात मात्र अनेक हालअपेष्टा सहन कराव्या लागत आहेत.