मंडणगड : मंडणगड पंचायत समिती बाल विकास प्रकल्पांतर्गत सावरी ग्रामपंचायत येथे राष्ट्रीय पोषण माह तसेच सेवा संकल्प अभियानांतर्गत विविध लोकोपयोगी उपक्रम मोठ्या उत्साहात राबविण्यात आले. या कार्यक्रमांच्या माध्यमातून पोषण, स्वच्छता, पर्यावरण संवर्धन आणि सामाजिक बांधिलकीचा प्रभावी संदेश ग्रामस्थांपर्यंत पोहोचवण्यात आला.
अभियानादरम्यान पोषण महाआरतीचे आयोजन करण्यात आले होते. तसेच परिसर स्वच्छता व वृक्षारोपण करून पर्यावरण संरक्षणाचा संकल्प करण्यात आला. सेवा संकल्प अभियानाचा भाग म्हणून लाभार्थी नागरिकांच्या घरी जाऊन ‘आशीर्वादाचा दिवा’ प्रज्वलित करण्यात आला, ज्याद्वारे समाजात जनजागृती व सक्रिय सहभागाची भावना निर्माण करण्यात आली.
या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा परिषद सदस्य मा. घोसाळकर, पंचायत समिती उपसभापती मा. दीपक मालुसरे, पंचायत समिती सदस्य मा. घडशी, पंचायत समिती सदस्य मा. रटाटे उपस्थित होते. तसेच ग्रामसेवक, स्थानिक प्रशासक, अंगणवाडी सेविका, मदतनीस, लाभार्थी माता व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी बाल विकास प्रकल्प अधिकारी तथा अंगणवाडी पर्यवेक्षिका दातीर मॅडम यांची प्रमुख उपस्थिती लाभली. त्यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करत मान्यवर, अंगणवाडी कर्मचारी, ग्रामस्थ व लाभार्थी मातांचे मनःपूर्वक आभार मानले.
स्थानिक मान्यवर आणि ग्रामस्थांच्या उत्स्फूर्त प्रतिसादामुळे हा संपूर्ण उपक्रम अत्यंत उत्साहपूर्ण व प्रेरणादायी वातावरणात पार पडला.
मंडणगड तालुक्यातील सावरी येथे ‘राष्ट्रीय पोषण माह’ व ‘सेवा संकल्प अभियान’ उत्साहात संपन्न; विविध उपक्रमांतून जनजागृती
