खेड : खेड तालुक्यातील चाकाळे बौद्धवाडी येथे आज दिनांक 21 मार्च 2026 रोजी दुपारी सुमारे 2:30 वाजण्याच्या सुमारास घरांच्या दिशेने येणारा भीषण वणवा लागल्याची घटना घडली. उन्हाच्या तीव्रतेमुळे आणि कोरड्या गवतामुळे आग वेगाने पसरत होती, त्यामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.
वणवा भडकत असताना चार घरांच्या दिशेने आग पोहोचली होती. मात्र, खेड पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी तसेच खेड नगर परिषद अग्निशामक विभागाच्या पथकाने तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. अग्निशामक दलाच्या प्रसंगावधान आणि जलद कृतीमुळे आग वेळेत आटोक्यात आणण्यात यश आले.
या वेळी फायरमन श्याम देवळेकर, दीपक देवळेकर, वाहन चालक गजानन जाधव तसेच सहायक फायरमन जयेश पवार आणि सुरज शिगवण यांनी धाडसी आणि समन्वयपूर्ण कामगिरी बजावली. त्यांच्या प्रयत्नांमुळे चार घरे जळण्यापासून थोडक्यात वाचली.
या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही, मात्र मोठा अनर्थ टळल्याने नागरिकांनी सुटकेचा श्वास सोडला. स्थानिक नागरिकांनी अग्निशामक दल आणि पोलीस प्रशासनाचे आभार मानले असून त्यांच्या तत्परतेचे कौतुक केले जात आहे.
दरम्यान, वणवा नेमका कशामुळे लागला याबाबत अद्याप स्पष्ट कारण समोर आलेले नसून याबाबत पुढील तपास सुरू आहे.
चाकाळे बौद्धवाडीत भीषण वणवा; अग्निशामक दलाच्या तत्परतेने चार घरे वाचली
