अलिबाग : रिपोर्टर:धम्मशील सावंत

खालापुरात शेकापचे लाल वादळ धडकणार ; ७९ व्या वर्धापन दिनासाठी २५ हजारांहून अधिक कार्यकर्ते उपस्थित राहणार..राज्य प्रवक्त्या चित्रलेखा पाटील यांची पत्रकार परिषदेत माहिती

शेतकरी कामगार पक्षाच्या ७९ व्या वर्धापन दिनानिमित्त रविवार, २ ऑगस्ट रोजी खालापूर येथे होणाऱ्या भव्य मेळाव्यासाठी रायगड सह राज्यभरातून २५ हजारांहून अधिक कार्यकर्ते उपस्थित राहणार असल्याची माहिती शेकापच्या राज्य प्रवक्त्या चित्रलेखा पाटील यांनी अलिबाग येथील शेतकरी भवनात आयोजित पत्रकार परिषदेत दिली.

चित्रलेखा पाटील म्हणाल्या की, हा मेळावा केवळ वर्धापन दिनाचा कार्यक्रम नसून शेकापच्या संघटनात्मक ताकदीचे प्रदर्शन ठरणार आहे. या मेळाव्यासाठी गेल्या महिनाभरापासून जिल्हाभरात जनसंपर्क मोहीम, तालुकानिहाय बैठका, गावभेटी आणि कार्यकर्ता संवाद आयोजित करण्यात आला असून त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे.

मेळाव्याला शेकाप सरचिटणीस जयंत पाटील, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार, आमदार सत्यजित तांबे, आमदार डॉ. बाबासाहेब देशमुख यांच्यासह विविध पक्षांचे दिग्गज नेते उपस्थित राहणार आहेत. तसेच शेकापचे ज्येष्ठ नेते, पदाधिकारी, महिला आघाडी, युवक आघाडी आणि राज्यभरातील हजारो कार्यकर्ते या मेळाव्यात सहभागी होणार असल्याचे त्यांनी सांगितले.