चिपळूण : (ललेश कदम) शहरातील खेंड संसारेवाडा परिसरात घरफोडी करून सुमारे 3 लाख 49 हजार रुपयांचा मुद्देमाल चोरीस नेल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी चिपळूण पोलिसांनी एका संशयिताला अटक केली आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना 19 मार्च 2026 रोजी रात्री 10 वाजेपासून ते 20 मार्च रोजी रात्री 12.30 वाजेच्या दरम्यान खेंड संसारेवाडा येथील भूषण संदेश संसारे वय 36, व्यवसाय व्यापार यांच्या राहत्या घरी घडली त्यानुसार त्यांनी तक्रार दिली आहे.
तक्रारदार संसारे व त्यांचे कुटुंबीय बाहेर फिरायला गेले असताना घरात कोणीही नसल्याचा फायदा घेत अज्ञात इसमाने घराची खिडकी उघडून आत प्रवेश केला. त्यानंतर कपाटातील रोख रक्कम व सोन्याचे दागिने असा एकूण 3 लाख 49 हजार रुपयांचा माल चोरून नेल्याचे तक्रारीत नमूद केले आहे. चोरीस गेलेल्या मालामध्ये 49 हजार रुपये रोख रक्कम तसेच सुमारे दोन तोळे वजनाचा सोन्याचा हार (अंदाजे किंमत 3 लाख रुपये) यांचा समावेश आहे.
या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपासादरम्यान पोलिसांनी सुहास जयंत कासार वय 28, रा. खेंड कांगणेवाडी याला संशयीत म्हणून अटक केली असून पुढील तपास चिपळूण पोलिस करीत आहेत.