लोटे : चिपळूण तालुक्यातील परशुराम मधील एस.पी.एम. इंग्लिश मिडीयम स्कुल, परशुराम च्या प्राथमिक विभागातील विद्यार्थी मास्टर अगस्त्य अनुपम आलमान याने ता. २९ मार्च २०२६ रोजी रत्नागिरी येथे आयोजित तायक्वांदो स्पर्धेमध्ये प्रतिष्ठेचा ‘ब्लॅक बेल्ट’ प्राप्त करून उल्लेखनीय यश संपादन केले आहे. त्याचे हे उल्लेखनीय यश चिपळूणसह रत्नागिरी जिल्ह्यासाठी अभिमानाची बाब ठरत आहे.
ही स्पर्धा रत्नागिरी तायक्वांदो स्पोर्ट्स असोसिएशन यांच्या वतीने आयोजित करण्यात आली होती. सदर स्पर्धा तायक्वांदो फेडरेशन ऑफ इंडिया तसेच तायक्वांदो असोसिएशन ऑफ महाराष्ट्र यांच्या मान्यतेखाली पार पडली.
अगस्त्य हा एस.पी. एम. इंग्लिश मिडीयम स्कूल परशुराम च्या प्राथमिक विभागातील विद्यार्थी असून, ब्लॅक बेल्ट मिळवणारा शाळेच्या प्राथमिक विभागातील पहिला विद्यार्थी ठरला आहे. त्याच्या या यशामुळे शाळा, शिक्षकवर्ग व पालकांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
अगस्त्यला अर्जुन कलगुटकी (चिपळूण) यांचे मार्गदर्शन लाभले. त्यांच्या प्रशिक्षणाखाली त्याने सातत्यपूर्ण सराव, शिस्त आणि चिकाटी यांच्या जोरावर ही उल्लेखनीय कामगिरी साध्य केली.
तायक्वांडोमधील ब्लॅक बेल्ट ही केवळ क्रीडा क्षेत्रातील पदवी नसून ती शिस्त, आत्मसंयम, आत्मविश्वास आणि मानसिक बळ यांचे प्रतीक आहे. ही पदवी मिळवण्यासाठी दीर्घकालीन मेहनत, समर्पण आणि दृढनिश्चय आवश्यक असतो.
तायक्वांडोमुळे विद्यार्थ्यांमध्ये आत्मरक्षण कौशल्य, संयम, आदरभाव आणि सकारात्मक दृष्टिकोन विकसित होतो, ज्यामुळे त्यांच्या सर्वांगीण व्यक्तिमत्त्व विकासास मोठी मदत होते.
अगस्त्यच्या या यशामुळे इतर विद्यार्थ्यांना क्रीडा क्षेत्रात सहभागी होण्यासाठी प्रेरणा मिळणार आहे. अगस्याचे नातेवाईक, मित्र परिवार तसेच परिसरातील मान्यवरांनी त्याचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत. तसेच प्रशिक्षक अरुण कलगुटगी यांचेही विशेष कौतुक करण्यात आले आहे.
अगस्त्यच्या या यशामुळे त्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी नवे दालन खुले झाले असून, भविष्यात तो आणखी मोठ्या स्तरावर यश संपादन करेल, असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे.
चिपळूण येथील विद्यार्थ्याची तायक्वांडो ब्लॅक बेल्ट मिळवून उल्लेखनीय कामगिरी
