रत्नागिरी : जिल्ह्यात सन २०२६ च्या खरीप हंगामात पावसातील दीर्घ खंडामुळे भात व नाचणी पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांना दिलासा मिळावा, यासाठी आमदार शेखर निकम यांनी मुख्यमंत्री महोदय देवेंद्र फडणवीस यांच्याकडे निवेदनाद्वारे विविध मागण्या केल्या आहेत.
रत्नागिरी, राजापूर व संगमेश्वर या तीन तालुक्यांचा ‘ट्रिगर-१’ अंतर्गत समावेश करण्यात आला असताना, चिपळूण, दापोली, खेड, मंडणगड, लांजा व गुहागर या उर्वरित सहा तालुक्यांचाही दुष्काळग्रस्त क्षेत्रात समावेश करावा, अशी मागणी त्यांनी केली आहे. जिल्ह्यातील खरीप पीक नुकसान पंचनाम्यांसाठी ५५,९६८ हेक्टर क्षेत्राचे नियोजन करण्यात आले असून, आतापर्यंत ४,८३३.१८ हेक्टर क्षेत्रावरील पंचनामे पूर्ण झाले आहेत. एकूण १७,०८४ शेतकरी बाधित आढळले असून, उर्वरित पंचनामे तातडीने पूर्ण करून पात्र शेतकऱ्यांना नुकसानभरपाई द्यावी, अशी विनंतीही करण्यात आली आहे.
दरम्यान, संभाव्य पाणीटंचाईवर मात करण्यासाठी विंधण विहिरी, नळ पाणीपुरवठा योजनांची दुरुस्ती आणि विहिरींचे खोलीकरण अशा १६४ प्रस्तावित कामांना प्रशासकीय मान्यता व निधी मंजूर करून तातडीने कार्यवाही करावी, अशी मागणी आमदार निकम यांनी केली आहे.
याचबरोबर, चिपळूण तालुक्यातील पिंपळी खुर्द येथे शासकीय मत्स्यबीज केंद्र उभारण्यासाठी ही त्यांनी मुख्यमंत्री महोदयांना स्वतंत्र पत्र दिले आहे. या केंद्रामुळे स्थानिक मत्स्य व्यावसायिकांना दर्जेदार मत्स्यबीज उपलब्ध होण्यास मदत होईल, तसेच युवकांसाठी रोजगाराच्या संधी निर्माण होऊन जिल्ह्यातील मत्स्य व्यवसायाला चालना मिळेल. या महत्त्वपूर्ण प्रकल्पाबाबत तातडीने सकारात्मक निर्णय घेण्याची आग्रही विनंती त्यांनी केली आहे.
शेतकऱ्यांना नुकसानभरपाई, ग्रामीण भागाला पाणीटंचाईतून दिलासा आणि मत्स्य व्यवसायाच्या विकासाला चालना मिळावी, यासाठी या सर्व मागण्यांवर शासनाने सकारात्मक निर्णय घ्यावा, असे आमदार शेखर निकम यांनी नमूद केले आहे.
