लांजा : तालुक्यासह व शहरामध्ये ईद-ए-मिलाद पारंपरिक पद्धतीने उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी प्रेषित मोहम्मद पैगंबर यांचे जन्म ठिकाण तथा मुस्लिम बांधवांचे सर्वोच्च श्रद्धेचे ठिकाण असलेले मक्का-मदीनाचे चित्र देखावा म्हणून बनवून वाजता गाजत मिरवणूक काढण्यात आली.
इस्लाम धर्माचे संस्थापक प्रेषित मोहम्मद पैगंबर यांचा जन्मदिवस ईद-ए-मिलाद म्हणून साजरा केला जातो. इस्लाममध्ये ईद-ए-मिलाद हा सर्वात मोठा दिवस मानला जातो. भारतातील मुस्लिम समाज बांधव हा सण वेगवेगळ्या धार्मिक विधींनी मोठ्या उत्साहात साजरा करतात. यानिमित्ताने दरवर्षीप्रमाणे लांजा शहरातील हजरत सय्यद चाँदशहा बुखारी दर्गा येथून दुपार नंतर ४ वाजता मिरवणुकीचा प्रारंभ होऊन बाजारपेठेतून हनुमान मंदिर, जुनी बाजारपेठ, विठ्ठलादेवी मंदिर, जामा मशीद मार्गे पुन्हा बाजारपेठेतून पुन्हा सायंकाळी दर्गा येथे येऊन मिरवणुकीचा समारोप झाला.
या मिरवणुकीवेळी लांजातील मानकरी सुधाकर (नाना) शेट्ये, लांजा पोलीस निरीक्षक निळकंठ बगळे, उपविभागीय पोलीस अधिकारी(गृह) रत्नागिरीचे मुख्त्यार शेख हे सहभागी झाले होते. याप्रसंगी त्यांचे मुस्लिम समाजाच्या वतीने पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला. दरम्यान, शहरातील मिरवणुकीला पोलीस यंत्रणेचे सहकार्य लाभले होते. तर या मिरवणुकीत मुस्लिम समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
