मुंबई : एसआयआरमध्ये 13 कोटी मतदारांना वगळण्यात आल्याचे सांगत लोकांची दिशाभूल करू नका. या 13 कोटींपैकी 6.30 कोटी हे कायमस्वरूपी स्थलांतरित झालेले आहेत तर 2.8 कोटी हे मृत झालेले मतदार आहेत, 1.2 कोटींची दुबार नोंदणी होती म्हणजे काही नागरिकांचे गावाकडे आणि शहरांमध्येही मतदार यादीत नाव होते. 3.1 कोटी हे अद्याप सापडलेले नाहीत. या तीन कोटी पात्र मतदारांना पुन्हा एकदा फॉर्म सहाच्या माध्यमातून नोंदणी करण्याचा अधिकार आहे. मात्र 2002 च्या मतदार यादीत नाव नसलेल्या बांगलादेशी घुसखोर आणि रोहिंग्यांना पुन्हा नोंदणी करता येणार नाही आणि त्यासाठीच निवडणूक आयोगाने एसआयआरची प्रक्रिया केली होती. हा 13 कोटींचा नाही तर फक्त तीन कोटींचा आकडा आहे, घुसखोरांची नावे पुन्हा मतदार यादीत यावीत यासाठीच निवडणूक आयोगाविरुद्ध आरोप केले जात आहेत, असा हल्लाबोल भाजपा प्रदेश मुख्य प्रवक्ते नवनाथ बन यांनी बुधवारी केला. भाजपा प्रदेश कार्यालयातील पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
श्री. बन पुढे म्हणाले, अमितभाई शहा यांनी काल सर्व विरोधकांची पोलखोल केली. कार्यकर्त्यांना धमकाऊन, बळजबरीने राहुल गांधींनी दिल्लीत बोलावले आणि संख्या किती? तर आठ-साडेआठ हजारांच्यावर नव्हती. संजय राऊत, तुम्ही जरा तुमचा भिंगाचा चष्मा नीट करा. भाजपा आणि एनडीएकडे तीनशेच्यावर खासदारांची संख्या असल्याने तुम्ही पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमितभाई शहा यांना घरी बसवण्याचे स्वप्न बघू नका. महाराष्ट्रातल्या जनतेने तुम्हाला आणि तुमच्या मालकाला घरी बसवले. दादरच्या शिवाजी पार्कवर तुम्ही आंदोलन केले, तिथे 200 ते 250च्या वर संख्या नव्हती आणि दिल्लीत 8 हजार आंदोलक जमवता आले नाही आणि या संख्येच्या बळावर झुंडशाही करण्याचा प्रयत्न करू नका. जनता पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमितभाई शहा यांच्यासोबत आहे.
जंतर-मंतर हे संसदेच्या परिसरात आहे. तिथे आजूबाजूला शहरातली वस्ती आहे. तिथे राहणाऱ्या लोकांना त्रास देण्याचे काम विरोधकांकडून जाणीवपूर्वक केले जात आहे. त्यामुळे जंतर-मंतरच्या बदल्यामध्ये तुम्हाला रामलीला मैदानासह दोन तीन मैदाने उपलब्ध करून दिली आहेत. आता रामलीला मैदानावर जाऊन तुम्हाला जी काही नौटंकी करायची असेल, ती करा. मात्र रामलीला मैदानावर रावणाचा काळ फार काही टिकत नाही. रामलीला मैदानावर रावणाचे दहन केले जाते. विरोधकरूपी रावणाचे दहन रामरूपी जनता रामलीला मैदानावर केल्याशिवाय राहणार नाही, हे जनाब संजय राऊत यांनी लक्षात ठेवावे, असे श्री. बन यांनी फटकारले.

जनाब संजय राऊत हे तेजस्वी सूर्याला झाकण्याचा प्रयत्न करणारे काजवे

विरोधक निवडणूक आयोग, सर्वोच्च न्यायालय आणि केंद्र सरकारविरोधात आंदोलन करत षडयंत्र रचण्याचा प्रयत्न करत आहेत. जनाब संजय राऊत यांना एकच सांगायचेय की, पंतप्रधान नरेंद्र मोदीजी हे जनतेने निवडून दिलेल्या सूर्यासारखे तेजस्वी आहेत तर विरोधक म्हणजे सूर्याचे तेज संपवण्याचा प्रयत्न करणारे काजवे आहेत. तुमच्यासारख्या काजव्यांनी त्यांना झाकण्याचा कितीही प्रयत्न केला तरी काही फरक पडणार नाही. शेर अकेला आता है आणि झुंडीने कोण येते, हे आपल्या सगळ्यांना माहित आहे, असा टोला श्री. बन यांनी लगावला.