चिपळूण : वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी दिलेल्या महाराष्ट्र बंदच्या हाकेला चिपळूणमध्ये उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. वंचित बहुजन आघाडीच्या नेतृत्वाखाली काढण्यात आलेल्या भव्य मोर्चात विविध राजकीय पक्ष, सामाजिक संघटना, विद्यार्थी आणि तरुण मोठ्या संख्येने सहभागी झाले. मोर्चादरम्यान केंद्र सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.
आज सकाळी शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून मोर्चाची सुरुवात करण्यात आली. त्यानंतर चिंचनाका मार्गे नगरपालिकेसमोरील इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्राजवळील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आला. तेथून मोर्चा चिपळूण पोलीस ठाण्यापर्यंत काढण्यात आला.
दिल्लीतील जंतर-मंतर येथे विद्यार्थ्यांवर झालेल्या लाठीचार्जचा निषेध, नीट (NEET) परीक्षा पेपरफुटी प्रकरणाची निष्पक्ष चौकशी आणि सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांच्या आंदोलनादरम्यान घडलेल्या घटनांच्या निषेधार्थ हा मोर्चा आयोजित करण्यात आला होता. यावेळी कार्यकर्त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि भाजप सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी करत परिसर दणाणून सोडला.
या मोर्चात भीमसैनिक, समता सैनिक दल, कुणबी बहुजन संघटना, मुस्लिम संघटना तसेच काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) यांच्यासह सुमारे १२ ते १३ सामाजिक व राजकीय संघटनांचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते सहभागी झाले होते. मोर्चामध्ये विद्यार्थी आणि तरुणांचा विशेष सहभाग लक्षवेधी होता
मोर्चा शांततेत पार पडला असून पोलीस प्रशासनाकडून आवश्यक बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
मोर्चा चिपळूण पोलीस ठाण्यासमोर आल्यानंतर प्रतिनिधींनी आपल्या मागण्यांचे निवेदन प्रशासनाकडे सादर केले. यावेळी पोलीस निरीक्षक फुलचंद मेंगडे यांनी उपस्थित मोर्चेकऱ्यांशी संवाद साधत, मोर्चा पूर्णपणे शांततेत पार पडल्याबद्दल समाधान व्यक्त केले. कोणताही अनुचित प्रकार घडला नाही तसेच आंदोलनकर्त्यांनी लोकशाही मार्गाने शांततापूर्ण पद्धतीने आपला निषेध नोंदवल्याबद्दल पोलीस प्रशासनाच्या वतीने त्यांनी सर्व मोर्चेकऱ्यांचे आभार मानले.
चिपळूणात वंचितच्या मोर्चाला उदंड प्रतिसाद; घोषणांनी शहर दणाणले
