लांजा: महसूल सेवक (कोतवाल) पदभरती सन २०२६ अंतर्गत १५ नोव्हेंबर रोजी होणारी लेखी परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे. त्यामुळे या परीक्षेसाठी अर्ज केलेल्या उमेदवारांनी याची नोंद घ्यावी, असे आवाहन लांजाच्या तहसीलदार प्रियांका ढोले यांनी केले आहे.

महाराष्ट्र शासनाच्या महसूल व वन विभाग, मंत्रालय मुंबई यांच्याकडून १२ नोव्हेंबर २०२६ रोजी याबाबत सूचना प्राप्त झाली आहे. नियोजित वेळापत्रकानुसार १५ नोव्हेंबर रोजी परीक्षा होणार होती. मात्र, प्रशासकीय सूचनेनुसार ही परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे.

परीक्षेची नवीन तारीख स्वतंत्रपणे जाहीर करण्यात येणार असून उमेदवारांनी पुढील सूचनेकडे लक्ष ठेवावे. अधिक माहितीसाठी लांजा तहसीलदार कार्यालयाशी संपर्क साधावा असे आवाहन तहसीलदार प्रियांका ढोले यांनी केले आहे.