देवरुख : येथील गुरववाडीमध्ये नवतरूण मित्र मंडळाच्या वतीने उभारण्यात आलेल्या नूतन सभागृहाचा भव्य उद्घाटन सोहळा चिपळूण-संगमेश्वर विधानसभा मतदारसंघाचे आमदार श्री. शेखरजी निकम यांच्या हस्ते उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. आमदार शेखर निकम यांच्या माध्यमातून तसेच अभिजित शेट्ये यांच्या विशेष प्रयत्नांतून साकारलेल्या या सुसज्ज सभागृहामुळे गुरववाडीतील सामाजिक, सांस्कृतिक आणि सार्वजनिक उपक्रमांसाठी हक्काची जागा उपलब्ध झाली आहे.

उद्घाटन सोहळ्यात आमदार शेखर निकम यांच्या सरळ, साध्या आणि सर्वांना आपलेसे करणाऱ्या स्वभावाचे तसेच त्यांच्या कार्यपद्धतीचे नगराध्यक्षा आणि मित्रपक्षासह विरोधी पक्षातील नगरसेवकांनी विशेष कौतुक केले. कोणताही गट-तट न पाहता सर्वांना समान न्याय देणे, पक्षविरहित दृष्टिकोनातून विकासकामांना प्राधान्य देणे आणि राजकारणापेक्षा समाजकारणाला महत्त्व देणे, ही आमदार निकम यांच्या कार्याची वैशिष्ट्ये असल्याचे मान्यवरांनी यावेळी नमूद केले.

यावेळी बोलताना आमदार शेखर निकम यांनी ‘लोकहित आणि राजकारणापेक्षा समाजकारण’ ही आपली भूमिका स्पष्ट केली. शहर असो वा ग्रामीण भाग, सर्वांचा समतोल विकास कसा साधता येईल, यावर आपले लक्ष केंद्रित असल्याचे त्यांनी सांगितले. “एखादे काम करताना त्याचा माझ्या राजकारणात किती उपयोग होईल किंवा मला किती मते मिळतील, याचा विचार मी कधीच करत नाही. लोकांच्या उपयोगाचे आणि विकासाला चालना देणारे काम झाले पाहिजे, एवढाच माझा प्रयत्न असतो,” असे त्यांनी स्पष्ट केले.

यावेळी आमदार निकम यांनी दिवंगत आदरणीय अजितदादा पवार यांच्या आठवणींना उजाळा देत त्यांच्या कार्यशैलीचा आणि विचारांचा उल्लेख केला. देवरुख शहरातील व गुरववाडीतील उर्वरित विकासकामेही टप्प्याटप्प्याने पूर्ण करण्यासाठी तसेच महायुतीच्या माध्यमातून शासनस्तरावर सातत्याने पाठपुरावा करण्याचे आश्वासन त्यांनी उपस्थित नागरिकांना दिले.

या सोहळ्यास नगराध्यक्षा मृणाल शेट्ये, उपनगराध्यक्ष वैभव पवार, माजी उपनगराध्यक्ष अभिजित शेट्ये, नगरसेवक बाळा कामेरकर, सागर संसारे, यशवंत गोपाळ, दीपक खेडेकर, दीपक गेल्ये, तसेच दादासाहेब गुरव, प्रफुल भुवड, बाळू ढवळे, प्रतीक साळवी, नितीन भोसले, पूर्वा पवार, राजू वनकुद्रे, महेश गुरव, मोहन हजारे, आनंद सार्दळ, दयानंद गुरव, संजय कदम, दर्शना गुरव, उत्तम पवार, रविंद्र लाड आदी मान्यवर व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

नवीन सभागृहामुळे गुरववाडीतील सामाजिक, सांस्कृतिक तसेच विविध सार्वजनिक कार्यक्रमांसाठी नागरिकांना हक्काची जागा उपलब्ध झाली आहे. या वास्तूमुळे परिसरातील सामाजिक उपक्रमांना निश्चितच नवी ऊर्जा मिळेल, अशी भावना नागरिकांनी व्यक्त केली. सभागृहासाठी सहकार्य करणाऱ्या आमदार शेखर निकम, अभिजित शेट्ये यांच्यासह सर्व मान्यवरांचे नागरिकांनी आभार मानले.

कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी नवतरूण मित्र मंडळाच्या सर्व सदस्यांनी व गुरववाडीतील ग्रामस्थांनी विशेष परिश्रम घेतले.