चिपळूण : कोकणात गणेशोत्सवाला मोठ्या भक्तिभावाने प्रारंभ झाला असून घरोघरी गणराय स्थानापन्न झाले आहेत. गणेशोत्सवाच्या चौथ्या दिवशी, आज गुरुवारी, घरोघरी गौराईचे वाजतगाजत, सवाद्य मिरवणुकीने आगमन होत आहे. गणेशोत्सवामध्ये गौरी पूजनाचा विधी महत्त्वाचा मानला जातो. अनेकांच्या घरी गणपतीबरोबरच गौराईचीही प्रतिष्ठापना केली जाते.

त्यानुसार आज माहेरवाशिणी असलेल्या गौराईचे मोठ्या जल्लोषात आगमन होत आहे. महिला नटूनथटून पाणवठ्यावर जाऊन गौरीमातेला विधिवत घरी घेऊन येत आहेत. चिपळूणच्या गोवळकोट परिसरातही मोठ्या उत्साहात गौराईचे आगमन झाले. यावेळी महिलांमध्ये मोठा उत्साह पाहायला मिळाला.

गौरीच्या स्वागतानंतर विविध ठिकाणी प्रथेनुसार नैवेद्य अर्पण केला जातो. काही ठिकाणी गौराईला पुरणपोळीचा नैवेद्य दाखवला जातो, तर काही ठिकाणी तिखटाचा नैवेद्य अर्पण करण्याची परंपरा आहे.

उत्साह, आनंद आणि मांगल्य घेऊन पार्वतीचे रूप मानल्या जाणाऱ्या गौरीचे घरोघरी आगमन झाल्याने सर्वत्र चैतन्याचे वातावरण निर्माण झाले आहे. महिलांसह कुटुंबातील सदस्यांमध्ये गौराईच्या आगमनाचा उत्साह पाहायला मिळत आहे.

चिपळूण शहरातील गोवळकोट भोईवाडी येथे पारंपरिक पद्धतीने ढोल ताशांच्या गजरात गौराईचे आगमन झाले. महिलांसमवेत ग्रामस्थ आणि छोटे मंडळी मोठ्या संख्येने सामील झाले होते.