लांजा : भविष्यात कोकणातील सर्व शासकीय कार्यालयात शिपाई ते उच्च पदस्य अधिकारी हे कोकणातीलच असतील यासाठी जिजाऊ सामाजिक व शैक्षणिक संस्थेच्या माध्यमातून संस्थापक अध्यक्ष निलेश सांबरे यांचे प्रामाणिक प्रयत्न सुरू असून त्याला यश देखील येत आहे मात्र त्यासाठी विद्यार्थ्यांनी शालेय जीवनात मोबाईल, टिव्ही सह अन्य सोशल मिडीयाचा वापर कमी करून अभ्यासाकडे लक्ष केंद्रित करा जिजाऊ संस्था तुमच्या पाठीशी आहे असे ठाम प्रतिपादन जिजाऊ संस्थेचे प्रेरणादायी व्याख्याते व साटवली विभागाचे विभागप्रमुख संदीप गोबरे यांनी जावडे येथे केले.
जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्था शाखा लांजा यांच्या वतीने हेरिटेज प्रयोग भूमी जावडे येथील प्राथमिक आश्रम शाळा, माध्यमिक आश्रम शाळा व न्यू इंग्लिश स्कूल जावडे येथील सुमारे ३५० गरजू व होतकरू विद्यार्थ्यांना आज सकाळी ११ वाजता मोफत वह्या वाटपाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता या वेळी प्रमुख मार्गदर्शक म्हणून संदीप गोबरे बोलत होते यावेळी हेरिटेज संस्थेचे संस्थापक संतोष कांबळे, जिजाऊ संस्थेचे आसगे विभाग प्रमुख राकेश राऊत ,जावडे गावचे प्रतिष्ठित ग्रामस्थ शेखर शिंदे ,रवींद्र नामे तसेच जिजाऊ संस्थेचे रोहन धनावडे , न्यू इंग्लिश स्कूल जावडेचे मुख्याध्यापक संदेश कांबळे,माध्यमिक आश्रम शाळेचे मुख्याध्यापक आनंद शिंत्रे प्राथमिक आश्रम शाळेचे मुख्याध्यापक विनोद मिडगुळे आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी संदीप गोबरे यांनी बोलताना सांगितले की, जिजाऊ संस्थेच्या वतीने संपूर्ण कोकणातील होतकरू, गरीब विद्यार्थ्यांना सुमारे ३५ लाख वह्यांचे वाटप करण्यात आले आहे त्याचाच एक भाग म्हणून आज हा कार्यक्रम येथे आयोजित करण्यात आला आहे. चार किंवा पाच वह्या विद्यार्थ्यांना देणे म्हणजे फार मोठे काम करतो असे नाही तर जिजाऊ संस्थेच्या वतीने संपूर्ण कोकणात सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून चाललेल्या विविध आरोग्य, शिक्षण व सामाजिक कामाची ओळख विद्यार्थ्यांना व्हावी आणि त्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप मिळावी आणि भविष्यात उच्च पदस्य अधिकारी व्हावेत या उदात्त हेतूनेच हे काम सुरू असून भविष्यात कोणतीही शैक्षणिक समस्या निर्माण झाली तर जिजाऊ संस्था तुमच्या पाठीशी ठामपने उभी असेल असा विश्वास देखील त्यांनी यावेळी दिला.
कार्यक्रमांचे प्रस्ताविक मुख्याध्यापक संदेश कांबळे यांनी केले व जिजाऊ संस्थेच्या या स्तुत्य उपक्रमाचे कौतुक केले तर सूत्रसंचलन ज्येष्ठ शिक्षिका कविता गावडे यांनी केले यावेळी जावडे गावचे ग्रामस्थ, पालक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.