मुंबई : राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या हत्येचे कोणी समर्थन करत असेल तर ते भारतीय संस्कृतीला धरून नाही. अहिंसा हे जैन धर्माचे तत्व आहे, त्यालाच ते छेद देणारे आहे. गांधी हत्येत सात आरोपी होते. त्यातील एक माफीचा साक्षिदार झाला, काहींना शिक्षा झाली. कपूर आयोगाचा अहवाल आहे, दिल्लीच्या लाल किल्ल्यातील न्यायालयाने शिक्षा ठोठावलेली आहे. हा सर्व दस्तावेज असताना जैन मुनीने गांधी हत्येचे समर्थन करावे हे योग्य नाही, असे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी म्हटले आहे.
‘शिवाजी कोण होता?’ या पुस्तकावरून शिवसेना आमदार संजय गायकवाड यांनी पुरोगामी कार्यकर्ते व पुस्तकाचे प्रकाशक प्रशांत आंबी यांना धमकी देण्याचा प्रकार अत्यंत गंभीर आहे. ‘पानसरेचे जे हाल केले, ते करू’ म्हणजे थेट खुनाची धमकी देण्यात आली आहे. प्रकाशक प्रशांत आंबी यांना राज्य सरकारने तातडीने सुरक्षा द्यावी. कॉ. गोविंद पानसरे यांच्या हत्येत या आमदाराचा देखील सहभाग आहे का? याची चौकशी सुद्धा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी करून खुलेआम गुंडगिरी करणाऱ्या या व्यक्तीवर तत्काळ कठोरात कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणीही हर्षवर्धन सपकाळ यांनी केली आहे.
