चिपळूण (विशेष प्रतिनिधी) : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मानवतावादी कार्य राष्ट्रासह संपूर्ण जगभरात सर्वदूर पोहोचले आहे. संघ कशा पद्धतीने कार्य करतो, याची ओळख समाजाला असली, तरी दैनिक सागरचा विशेषांक संघाच्या सामाजिक कार्याची आंतरिक ओळख निर्माण करून देणारा ठरेल, असे गौरवोद्गार राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या अखिल भारतीय कार्यकारिणीचे सदस्य श्री. भैय्याजी जोशी यांनी काढले. तेव्हा उपस्थितांनी टाळ्यांचा कडकडाट करून दैनिक सागरच्या विशेषांकाचे कौतुक केले.

संघाचे द्वितीय सरसंघचालक गोळवलकर गुरुजी यांच्या गोळवली येथील गावी राष्ट्रीय सेवा समिती संचालित परमपूज्य गोळवलकर गुरुजी स्मृती ग्रामविकास प्रकल्पाच्या प्रांगणात श्री. भैय्याजी जोशी व मान्यवरांच्या हस्ते दैनिक सागरच्या विशेषांकाचे प्रकाशन उत्साहपूर्ण वातावरणात करण्यात आले.

संघाच्या शताब्दी वर्षानिमित्त दैनिक सागरने ‘राष्ट्रीय स्वयंसेवक संघ शतकभराचा प्रवास’ या शीर्षकाखाली शताब्दी विशेषांक हा शंभर पानांचा खास अंक श्री. भैय्याजी जोशी, रत्नागिरी विभाग संचालक श्री. दत्ताजी सोलकर, प्रकल्पाचे व्यवस्थापक श्री. चंद्रशेखर देशपांडे, दैनिक सागरच्या संपादक श्रीमती शुभदा निशिकांत जोशी, उद्योजक श्री. राजूसाहेब जोशी, सौ. अश्विनी जोशी यांच्या हस्ते विशेषांकाचे प्रकाशन करण्यात आले. व्यासपीठावरील मान्यवरांचा सत्कार श्री. राजूसाहेब जोशी यांच्या हस्ते करण्यात आला. त्यानंतर विशेषांक प्रकाशित करण्यामागची भूमिका श्री. राजूसाहेब जोशी व सीए मंदार लेले यांनी विशद केली. त्यानंतर प्रकल्पाचे कोषाध्यक्ष प्रकाश पाध्ये यांनी स्मृतीकेंद्राची माहिती दिली.

संघाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीचे सदस्य श्री. भैय्याजी जोशी यांनी सागरच्या विशेषांकाचे कौतुक करताना संघाच्या शंभर वर्षांच्या वाटचालीचा आढावा घेतला. प्राध्यापिका सोनाली खर्चे यांनी म्हटलेल्या पसायदानाने कार्यक्रमाची सांगता झाली. संघाचे उत्तर रत्नागिरी प्रचारप्रमुख डॉ. सुदेश आयरे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.

कार्यक्रमाला पद्मश्री दादा इदाते, निवृत्त एअर मार्शल हेमंत भागवत, संघाचे पदाधिकारी कैलास सोनटक्के, शरद ओगले, प्रसाद आगवेकर, उत्तमराव आंबेकर, अमित पाल, डॉ. मीनल ओक आदी मान्यवर उपस्थित होते.

दैनिक सागरचा हा विशेषांक १५ ऑक्टोबर रोजी नेहमीच्या अंकासोबत विनामूल्य भेटस्वरूपात दिला जाणार आहे. अंकाचे प्रकाशन झाल्यानंतर संघाच्या स्वयंसेवकांनी अंकाचे कौतुक केले. भारतमातेच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली.