चिपळूण : डी.बी.जे. कॉलेजच्या समोरील रस्त्यावरून होणारी वेगवान वाहनांची वाहतूक आणि विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न लक्षात घेऊन, या ठिकाणी तातडीने योग्य गतिरोधक बसविण्यात यावेत, अशी मागणी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) युवासेनेच्या वतीने राष्ट्रीय महामार्ग उपविभाग, चिपळूण कार्यालयाकडे निवेदनाद्वारे करण्यात आली.

कॉलेज समोरील मार्गांवरून दररोज मोठ्या संख्येने विद्यार्थ्यांची ये-जा होत असताना, या मार्गावरून धावणाऱ्या अवजड वाहनांसह इतर प्रवासी वाहनांचा वेग चिंतेचा विषय ठरत आहे. यापूर्वी बसविण्यात आलेले गतिरोधक सततच्या वाहतुकीमुळे सपाट झाल्याने ते वाहनचालकांच्या सहज लक्षात येत नसल्याची बाब निवेदनातून निदर्शनास आणून देण्यात आली. संभाव्य अपघात टाळण्यासाठी संबंधित विभागाने तातडीने पाहणी करून वाहतूक सुरक्षेच्या तांत्रिक निकषांनुसार स्पष्टपणे दिसणारे गतिरोधक बसवावेत, अशी मागणी करण्यात आली आहे.

युवासेना शहर अधिकारी पार्थ जागुष्टे यांच्या नेतृत्वाखाली हे निवेदन युवासेना उपविभाग अधिकारी शाकीर अरकाटे यांच्या वतीने राष्ट्रीय महामार्ग उपविभागाच्या कार्यालयात सादर करण्यात आले. यावेळी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे जिल्हा सोशल मीडिया प्रमुख सचिन चोरगे, शहर सचिव प्रशांत मुळ्ये, युवासेना उपशहर अधिकारी आकाश कदम तसेच युवा सेनेचे झियाद चिकटे, इबाद बांगी, शुमेल उपस्थित होते.

विद्यार्थ्यांची सुरक्षितता हा केवळ महाविद्यालयापुरता मर्यादित विषय नसून, तो सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेतील महत्त्वाचा प्रश्न आहे. त्यामुळे कोणतीही दुर्घटना घडण्यापूर्वी संबंधित यंत्रणेने या मागणीची गांभीर्याने दखल घेऊन आवश्यक कार्यवाही करावी, अशी अपेक्षा युवासेनेच्या वतीने व्यक्त करण्यात आली.