दापोली:- दापोली तालुक्यातील केळशी विभागातील आदगाव येथील शेतकरी कुटुंबातील श्री. प्रदीप हरिश्चंद्र गावडे यांनी आपल्या मेहनत, जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर शिक्षक होण्याचे वडिलांचे स्वप्न पूर्ण केले आहे. शासनाच्या शिक्षक पदासाठी आवश्यक असलेल्या विविध परीक्षा उत्तीर्ण होत त्यांनी नुकतीच दापोली तालुक्यातील माळवी येथील जिल्हा परिषद मराठी प्राथमिक शाळेत शिक्षक म्हणून नियुक्ती मिळवून कार्यभार स्वीकारला आहे.
प्रदीप गावडे हे आदगाव येथील शेतकरी कुटुंबातील असून, दुर्गम भागातील प्रतिकूल परिस्थितीवर मात करत त्यांनी शिक्षण पूर्ण केले. वडिलांची इच्छा आणि आपल्या मेहनतीच्या जोरावर त्यांनी विविध स्पर्धात्मक व पात्रता परीक्षा देत शिक्षक पदासाठी आवश्यक पात्रता मिळवली. त्यांच्या या यशामुळे आदगाव तसेच संपूर्ण केळशी विभागातील तरुणांसमोर एक प्रेरणादायी आदर्श निर्माण झाला आहे.
प्रदीप गावडे यांच्या शिक्षकपदी झालेल्या नियुक्तीबद्दल शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने विशेष सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला. यावेळी केळशी विभाग प्रमुख श्री. विजय साबळे यांच्या हस्ते सत्कारमूर्ती श्री. प्रदीप हरिश्चंद्र गावडे यांचा सत्कार करण्यात आला.
या कार्यक्रमास विभाग प्रमुख श्री. विजय साबळे, सचिव श्री. अजय जाधव, उंबरशेत शाखाप्रमुख श्री. यशवंत बटावळे, अंबोली शाखाप्रमुख श्री. रामचंद्र बंगाल तसेच शिवसैनिक कार्यकर्ते श्री. बळीराम हुके (केळशी), श्री. सोनू गोरिवले (उंबरशेत), श्री. खांबे (आदगाव) यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
यावेळी उपस्थित मान्यवरांनी प्रदीप गावडे यांच्या यशाचे कौतुक करून त्यांना पुढील शैक्षणिक व सामाजिक वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. दुर्गम भागातील शेतकरी कुटुंबातून पुढे येऊन शिक्षकपदापर्यंत मजल मारणे ही निश्चितच अभिमानाची बाब असून, त्यांच्या यशातून ग्रामीण भागातील तरुणांनी प्रेरणा घ्यावी, असे मत उपस्थितांनी व्यक्त केले.
कार्यक्रमात पक्षाचे सचिव श्री. अजय जाधव यांनी सत्कारमूर्ती प्रदीप गावडे यांच्याबद्दल मनोगत व्यक्त करत त्यांच्या मेहनतीचे, जिद्दीचे आणि कर्तृत्वाचे कौतुक केले. त्यांच्या यशामुळे कुटुंबासह केळशी विभागाचेही नाव उज्ज्वल झाले असल्याचे त्यांनी सांगितले.
सत्काराला उत्तर देताना श्री. प्रदीप हरिश्चंद्र गावडे यांनी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने करण्यात आलेल्या सत्काराबद्दल सर्व पदाधिकारी, शिवसैनिक आणि उपस्थितांचे मनःपूर्वक आभार मानले. मिळालेल्या सन्मानामुळे आपल्याला पुढील कार्यासाठी निश्चितच प्रेरणा मिळेल, अशी भावना त्यांनी व्यक्त केली.
शेतकरी कुटुंबातून प्रतिकूल परिस्थितीत शिक्षण घेत शिक्षकपद मिळविलेल्या प्रदीप गावडे यांच्या या यशाचे केळशी विभागातून कौतुक होत असून, त्यांच्या नियुक्तीमुळे परिसरातील तरुणांमध्येही शिक्षण आणि स्पर्धात्मक परीक्षांबाबत नवी प्रेरणा निर्माण झाली आहे.
दापोली तालुक्यातील केळशी येथील प्रदीप गावडे यांची शिक्षकपदी नियुक्ती…
