खेड : तालुक्यातील भरणे-बाईतवाडी येथील आदित्य रेसिडेन्सी या इमारतीमधील दोन बंद घरे चोरट्यांनी दिवसाढवळ्या फोडून सुमारे ७ लाख ९८ हजार रुपये किमतीचे सोन्या-चांदीचे दागिने आणि रोकड लंपास केल्याची धाडसी घटना घडली आहे. याप्रकरणी खेड पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही चोरी बुधवारी (ता. ७) दुपारी १२.१५ ते १.२५ या अवघ्या तासाभराच्या कालावधीत झाली.
अभय सहदेव देसाई (वय ४९, मूळ रा. भडगाव, सध्या रा. भरणे-बाईतवाडी) यांनी याबाबत पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आदित्य रेसिडेन्सी (फ्लॅट नं. १०१) येथील रहिवासी अभय देसाई हे दुपारी घर बंद करून बाहेर गेले होते. याच कालावधीत अज्ञात चोरट्याने त्यांच्या बंद घराच्या दरवाजाची कडी व कुलूप तोडून आत प्रवेश केला. एवढेच नव्हे तर चोरट्याने शेजारीच असलेला मिलिंद तुकाराम अदावडे यांचा फ्लॅट नं. १०३ चाही दरवाजा व कुलूप तोडून आत प्रवेश केला आणि दोन्ही घरातील मौल्यवान सोन्या-चांदीचे दागिने व रोकड चोरून पोबारा केला. चोरीस गेलेल्या ऐवजामध्ये सोन्याच्या २ चेन सुमारे दीड तोळ्याच्या असून त्याची किंमत २ लाख २० हजार रूपयांची आहे. २ ६० हजार रूपयांचे सोन्याची २ ब्रेसलेट, १ लाख १० हजार रूपयांचे सोन्याची २ जोडी रिंग, १ लाखाचा सोन्याचा हार, २ लाखाची सोन्याची ३ नाणी, २० हजाराचे सोन्याचे टॉप्स, १० हजाराची सोन्याची बाळी, सोन्याची नथ २५ हजाराची, ४० हजाराचे चांदीचे दागिने, चांदीचा कंबरपट्टा आणि १० हजार रूपये रोख असा ऐवज चोरीस गेला. दिवसाढवळ्या मुख्य वस्तीत झालेल्या या धाडसी घरफोडीमुळे भरणे-बाईतवाडी परिसरात घबराटीचे वातावरण पसरले असून, पोलीस अज्ञात चोरट्याचा शोध घेत आहेत.