लांजा : लांजा तालुक्यातील आंजणारी घाटात शुक्रवारी सकाळी ११:२५ वाजण्याच्या सुमारास कोळसा वाहतूक करणारा एक ट्रक तीव्र उतारावर पलटी झाल्याची दुर्घटना घडली. या अपघातात ट्रकचा चालक गंभीर जखमी झाला असून, त्याला स्थानिकांच्या मदतीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
अपघात झाल्यानंतर त्वरित स्थानिक ग्रामस्थ आणि पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी ट्रकमध्ये अडकलेल्या गंभीर जखमी चालकाला शर्थीचे प्रयत्न करून बाहेर काढले. त्यानंतर अधिक उपचारासाठी त्याला तातडीने रत्नागिरी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. आंजणारी घाटातील तीव्र उतारामुळे गेल्या महिनाभरात याच परिसरात तब्बल सहा ते सात अपघात झाले आहेत. या अपघातांमध्ये अनेक वाहन चालक जखमी झाले असून, या धोकादायक टप्प्यावर प्रशासनाकडून ठोस उपाययोजना करण्याची मागणी नागरिक व वाहन चालकांकडून केली जात आहे.