चिपळूण : परशुराम एज्युकेशन सोसायटी, चिपळूण संचलित एस. डी. गद्रे इंग्लिश मीडियम स्कूल या प्रशालेने एस.एस.सी. मार्च २०२६ परीक्षेत शंभर टक्के निकालाची उज्ज्वल परंपरा कायम राखत उल्लेखनीय यश संपादन केले आहे. विद्यार्थ्यांच्या मेहनतीसह शिक्षकांचे सक्षम मार्गदर्शन आणि पालकांचे सहकार्य यामुळे यंदाही प्रशालेचा निकाल अत्यंत समाधानकारक लागला असून संपूर्ण शाळा परिवारात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

यंदाच्या परीक्षेत कुमार प्रेम सचिन चोरगे याने ९२.२० टक्के गुण मिळवून शाळेत प्रथम क्रमांक पटकावला. कु. कृष्णाई संतोष महाडिक हिने ९१.६० टक्के गुण मिळवून द्वितीय क्रमांक मिळविला, तर कुमार पियुष निशिकांत पवार याने ९१.४० टक्के गुणांसह तृतीय क्रमांक प्राप्त केला.शाळेच्या सातत्यपूर्ण गुणवत्तापूर्ण शिक्षणपद्धतीमुळेच हा उल्लेखनीय निकाल लागला असल्याची भावना व्यवस्थापन आणि शिक्षकवर्गाकडून व्यक्त करण्यात आली. या यशामुळे परिसरातून विद्यार्थ्यांवर अभिनंदनाचा वर्षाव होत असून एस. डी. गद्रे इंग्लिश मीडियम स्कूलने पुन्हा एकदा आपल्या शैक्षणिक गुणवत्तेचा ठसा उमटविला आहे.