चिपळूण : घर आणि व्यवसाय यांचा समतोल साधत स्वतःची व्यावसायिक ओळख निर्माण करणाऱ्या महिलांचे उदाहरण म्हणून चाफा बुटीकच्या संचालिका स्वरा संकेत कुलकर्णी यांच्या प्रयत्नांकडे पाहता येईल. मार्कंडी परिसरातील या बुटीकमध्ये विजयादशमीच्या मुहूर्तावर साडी विभाग सुरू करण्यात आला. चिपळूण नागरी सहकारी पतसंस्थेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आणि उद्योजिका स्वप्ना प्रशांत यादव यांच्या हस्ते मंगळवारी (ता. २०) उद्घाटन झाले.
ऑगस्टमध्ये सुरू झालेल्या चाफा बुटीकला दोन महिन्यांतच ग्राहकांचा प्रतिसाद मिळू लागला आहे. रेडिमेड कपडे, कुर्ती, वेस्टर्न वेअर, ड्रेस मटेरियल आणि आर्टिफिशियल ज्वेलरीबरोबर आता साड्यांचे कलेक्शनही उपलब्ध झाले आहे. दैनंदिन वापर, सण-समारंभ आणि लग्नसराईसाठी विविध पर्याय एकाच ठिकाणी देण्याचा बुटीकचा प्रयत्न आहे.
घर सांभाळून व्यवसाय करणाऱ्या स्वरा कुलकर्णी या खऱ्या अर्थाने दुर्गा आहेत, असे गौरवोद्गार स्वप्ना यादव यांनी काढले. महिलांच्या उद्यमशीलतेचा सन्मान करणारा हा प्रसंग विजयादशमीच्या पार्श्वभूमीवर विशेष ठरला.
ग्राहकांच्या आवडीनिवडी लक्षात घेऊन निवडक आणि दर्जेदार वस्तू उपलब्ध करून देण्यावर भर असल्याचे स्वरा कुलकर्णी यांनी सांगितले. सध्या सण व लग्नसराईच्या खरेदीवर १० टक्के सवलतीची योजना सुरू आहे. उद्घाटनप्रसंगी बुटीकचे ग्राहक आणि हितचिंतक उपस्थित होते.
फोटो ओळ : चाफा बुटीकच्या साडी विभागाच्या उद्घाटनप्रसंगी स्वप्ना यादव, स्वरा कुलकर्णी आणि उपस्थित महिला.
