खेड :- येथील सहजीवन शिक्षण प्रसारक मंडळ खेड संचालित आयसीएस महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने राष्ट्रपिता महात्मा गांधी जयंती व भारताचे माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री जयंती उत्साहपूर्ण वातावरणात उपप्राचार्य डाॅ आर. एस. भालेराव यांच्या अध्यक्षतेखाली आणि ग्रंथपाल डाॅ. राजेश राजम, व प्रा. अभिमन्यू जाधव यांच्या उपस्थितीत
साजरी करण्यात आली.
या कार्यक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना दोन्ही महान व्यक्तिमत्त्वांच्या विचारांची, कार्याची आणि राष्ट्रसेवेच्या योगदानाची माहिती देण्यात आली.
या कार्यक्रमास महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. आर. एस. भालेराव, ग्रंथपाल डॉ. राजेश राजम तसेच प्रा. अभिमन्यू जाधव उपस्थित होते. कार्यक्रमास महाविद्यालयातील बहुसंख्य विद्यार्थी तसेच राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक उपस्थित होते.
राष्ट्रीय सेवा योजना विभागप्रमुख प्रा. एम. के. केळकर यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. यावेळी त्यांनी महात्मा गांधीजींचे सत्य, अहिंसा व स्वच्छतेचे विचार तसेच लालबहादूर शास्त्री यांच्या साधेपणा, प्रामाणिकपणा आणि देशसेवेच्या भावनेविषयी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
याप्रसंगी उपप्राचार्य डॉ. आर. एस. भालेराव यांनी महात्मा गांधीजी व लालबहादूर शास्त्री यांच्या जीवनातील प्रेरणादायी छोटे-छोटे किस्से सांगत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. त्यांच्या जीवनातील विविध प्रसंगांच्या माध्यमातून सत्य, अहिंसा, प्रामाणिकपणा, साधेपणा, शिस्त आणि देशभक्ती या मूल्यांचे महत्त्व त्यांनी विद्यार्थ्यांना पटवून दिले.
महात्मा गांधीजी व लालबहादूर शास्त्री यांच्या विचारांचा आदर्श विद्यार्थ्यांनी आपल्या दैनंदिन जीवनात अंगीकारावा आणि जबाबदार नागरिक म्हणून समाजाच्या विकासात योगदान द्यावे, असा संदेश या कार्यक्रमातून देण्यात आला.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या स्वयंसेवकांनी विशेष परिश्रम घेतले.