खेड :- तालुक्यातील जामगे गावातील जि. प. आरोग्य विभागाच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात श्रीमती मयुरी वाघे या महिलेची यशस्वी प्रसृती येथील आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांनी केली असून, बाळ – बाळंतीण सुखरुप आणि आनंदात आहेत. यशस्वी प्रसृती येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात केल्याबद्दल जामगे पंचक्रोशीतुन महिला वर्गातून समाधान व्यक्त होत आहे.
तालुक्यातील आंबये गावातील आंबये नवानगर येथील आदिवासी समाजातील मयुरी महेश वाघे (वय २२) यांची प्राथमिक आरोग्य केंद्र, जामगे येथे या प्रसूतीसाठी दाखल झाल्या होत्या. येथील वैद्यकीय अधिकाऱी डाॅ. नम्रता भुवड व डाॅ आदित्य चिंघे यांनी महिलेची वैद्यकीय तपासणी करून प्रसूतीसाठी दाखल करून घेत, येथील वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली महिलेची प्रसृती यशस्वीरित्या पार पडली. बाळंतीण आणि बाळंतीण महिलेच्या आरोग्याची खबरदारी वैद्यकीय अधिकारी घेत आहेत.
प्रसूतीवेळी श्री. शंकर पार्टे, LHV प्रतीक्षा जाधव, ANM शुभांगी हरावडे, आशा सेविका प्राची कदम तसेच वाहनचालक अमित कदम यांनी महत्त्वपूर्ण सहकार्य केले. प्राथमिक आरोग्य केंद्र जामगे येथील डॉक्टर, परिचारिका, आरोग्य कर्मचारी व आशा सेविका यांच्या तत्पर सेवेमुळे ही दुसरी प्रसूती यशस्वीपणे पार पडली. ग्रामीण व आदिवासी भागातील मातांना सुरक्षित आणि वेळेवर आरोग्यसेवा उपलब्ध करून देण्यासाठी आरोग्य विभागाच्या वतीने सातत्याने प्रयत्न केले जात आहेत. महिलेच्या यशस्वी प्रसृती झाल्याबद्दल येथील जामगे प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय पथकाचे पंचक्रोशीतुन कौतुक होत आहे.