खेड (दिवाकर प्रभु) : सैनिकांचे गाव म्हणून ओळख असलेल्या तालुक्यातील शिवतर गावातील धरणाचे काम जवळपास पूर्ण झाले आहे. या धरणाचे काम करताना चुकीच्या पद्धतीने रस्त्याच्या खालच्या बाजूची माती काढण्यात आली आहे. त्यामुळे १४ जुलै २०२४ रोजी शिवतर-नामदरेवाडी रस्ता एका ठिकाणी खचला. वारंवार तक्रार करूनही जलसंधारण विभाग व ठेकेदार यांच्या दुर्लक्षामुळे गुरुवार, दिनांक १९ जून २०२५ रोजी हा रस्ता पुन्हा दुसऱ्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात खचला आहे. २०२४ पासून या रस्त्यावरून होणारी सर्व प्रकारची वाहतूक ऑक्टोबर २०२५ पर्यंत पूर्णपणे बंद होती. हा रस्ता धोकादायक असल्याने पावसाळ्यात परिवहन सेवेने (एसटी)ही वाहतूक बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.

रस्त्याच्या धरणाकडील बाजूने जवळजवळ ७०० ते ८०० फूट लांबीची संरक्षक भिंत बांधणे अत्यंत गरजेचे असून, या बाबत अनेक वेळा पत्रव्यवहार करूनही कार्यवाही होत नसल्याने संतप्त झालेल्या माजी सैनिकांसह ग्रामस्थांनी येत्या स्वातंत्र्यदिनी, म्हणजेच १५ ऑगस्ट २०२६ रोजी शिवतर-कोडबा धरणात जलसमाधी आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. याबाबत राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) चे आमदार डॉ. जितेंद्र आव्हाड यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून उपाययोजना करण्याचे आवाहन केले आहे. तसेच शिवतर ग्रामस्थ शिक्षण संस्था, मुंबई यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि जलसंपदा मंत्री संजय राठोड यांना निवेदन दिले आहे.

महाराष्ट्र शासनाच्या जलसंधारण विभागामार्फत रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यातील शिवतर गावात ‘शिवतर-कोडबा’ हे मातीचे धरण बांधण्यात आले आहे. या धरणाच्या मागील बाजूस सुमारे ७० ते ७५ घरांची लोकवस्ती असलेली नामदरेवाडी आहे. या वाडीला जोडण्यासाठी शिवतर-दत्तवाडी ते नामदरेवाडी हा २.२७५ किलोमीटर अंतराचा एकमेव रस्ता आहे. हा रस्ता बंद झाल्यास नामदरेवाडीचा जगाशी संपर्क तुटू शकतो, याची जाणीव असूनही धरणाचे बांधकाम करताना रस्त्याच्या खालच्या बाजूने अत्यंत चुकीच्या पद्धतीने मातीचे उत्खनन करण्यात आले. त्यामुळे १४ जुलै २०२४ रोजी या रस्त्याचा काही भाग वाहून गेला.

ही बाब ग्रामस्थांनी लक्षात आणून दिल्यानंतर मे २०२५ मध्ये, वर्षभरानंतर, ढासळलेल्या ठिकाणी जुजबी दुरुस्ती करण्यात आली. त्यानंतर, आधीच रस्ता वाहून गेल्याचा अनुभव असतानाही, पुन्हा रस्त्याच्या खालच्या बाजूने गेले वर्षभर मातीचे उत्खनन करण्यात आले. त्यामुळे हा संपूर्ण रस्ता आता धोकादायक झाला आहे. या परिसरात पावसाचे प्रमाण जास्त असल्याने डोंगरातून येणाऱ्या पाण्याच्या प्रवाहामुळे जवळजवळ ७०० ते ८०० फूट लांबीचा रस्ता पुढील पाच वर्षांत टप्प्याटप्प्याने पूर्णतः वाहून जाण्याची शक्यता आहे. याची जिल्हा जलसंधारण अधिकारी, रत्नागिरी यांना पूर्ण कल्पना आहे. मात्र, त्यावर कोणतीही कार्यवाही किंवा संरक्षक भिंत बांधण्याची तयारी दिसत नसल्याने १५ ऑगस्ट रोजी जलसमाधी आंदोलन करण्यात येणार असल्याचे शिवतर ग्रामस्थ शिक्षण संस्था, मुंबईचे सचिव सुनील मोरे यांनी सांगितले.

दरम्यान, शिवतर गावाचा परिसर वनराईने वेढलेला असल्याने येथे सर्पदंशासारख्या घटना घडल्यास रुग्णांना तसेच गर्भवती महिलांना वाहन उपलब्ध होणे अशक्यप्राय ठरणार आहे. परिणामी, रुग्णांना डोलीचा आधार घ्यावा लागणार असून, त्यातून एखादी अप्रिय घटना घडल्यास त्याची जबाबदारी अप्पर आयुक्त तथा मुख्य अभियंता, मृद व जलसंधारण विभाग यांची असेल, असे सुनील मोरे यांनी म्हटले आहे. यासंदर्भात मृद व जलसंधारण विभाग, जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी (जिल्हा परिषद), सार्वजनिक बांधकाम विभाग, रत्नागिरी यांच्याशी पत्रव्यवहार करण्यात आला आहे. मात्र, रस्त्याच्या खालच्या बाजूने संरक्षक भिंत बांधण्याचा निर्णय न झाल्यास येत्या १५ ऑगस्ट २०२६ रोजी स्वातंत्र्यदिनी जलसमाधी आंदोलनाचा मार्ग स्वीकारावा लागेल, असा इशारा त्यांनी दिला आहे.