खेड ( दिवाकर प्रभु ) : – गोवा- सिंधुदुर्ग ते रत्नागिरी मार्गातून मार्गस्थ होणारे नशा मुक्ती भारत अभियानाचा सांगता समारोह रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर तालुक्यामध्ये साईनगर येथील ब्रह्माकुमारी हॉलमध्ये उत्साहात पार पडला.
हे अभियान ओरस मधून सुरू होऊन कुडाळ मालवण दोडामार्ग राठिवडे कणकवली राजापूर लांजा या तालुक्यातील अनेक छोट्या छोट्या गाव शाळा व हायस्कूल तसेच ग्रामपंचायत व नगरपालिकांना भेट देऊन तेथे नशामुक्तीसाठी लोकांमध्ये जागृती आणण्याचे कार्य करत होते. या अभियानामध्ये अतिशय सुंदर चित्ररथ व मोठा एलसीडी प्रोजेक्टर उपलब्ध होते. कुंभकर्ण समान झोपलेल्या मनुष्यांना नशेतून जागृती आणण्यासाठी कुंभकर्ण जागृतीचे चलचित्र व नशा मुक्तीसाठी नशा चे दुष्परिणाम दाखवणारे व्हिडिओ प्रोजेक्ट उपलब्ध होते. तसेच नशा मुक्ती दानपेटी ( व्यसन दानपेटी ) उपलब्ध करून अनेकांना नशेपासून मुक्त करण्याचे कार्य व्यसन दान घेऊन केले गेले.
अनेक ग्रामपंचायत, गाव शाळा, हायस्कूल, पंचायत समिती, यातून एकूण १११ कार्यक्रम राबविण्यात आले. तसेच आठवडा बाजार, बस स्टॅन्ड, मॉल इत्यादी गजबजलेल्या ठिकाणी हे अभियान नशा मुक्तीसाठी अनेक कार्यक्रम करून पुढे जात होते. या अभियानाचे उद्दिष्ट सफल होताना यातून जवळजवळ वीस ते बावीस हजार लाभार्थी घडले गेले. तसेच हजारो लोकांनी आपल्या नशेचे दान दानपेटी मध्ये सोडून नशा न करण्याची प्रतिज्ञा घेतली.
सरतेशेवटी या नशा मुक्ती भारत अभियानाचा सांगता समारोह राजापूर नगरीमध्ये साईनगर येथील ब्रह्माकुमारी हॉलमध्ये पार पडला. या सांगता समारोहासाठी प्रमुख पाहुणे राजापूर नगरीच्या माजी आमदार व नगराध्यक्षा हुस्नबानू खलीफे, नगरसेविका सुयोगा जठार, माजी नगराध्यक्ष जयप्रकाश नार्वेकर, तसेच एसटी डेपो कार्यशाळा अधीक्षक प्रकाश झोरे, गोवा व सिंधुदुर्ग संचालिका शोभा दीदी उपस्थित होत्या. अभियानातील समाविष्ट कार्यकर्त्यांनी राजापूर नगरीमध्ये शोभा यात्रेचे आयोजन केले होते. सांगता समारोहामध्ये सर्व अभियानातील कार्यकर्ते, तसेच सहकारी तालुकाप्रमुख यांना पुष्पगुच्छ व सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले.
