खेड ( दिवाकर प्रभु ) : – कोकण विभागातील आमदारांनी धनगर समाजाच्या एस. टी. आरक्षण अंमलबजावणी करण्याच्या मागणीकडे दुर्लक्ष केल्याने धनगर समाजातून नाराजी व्यक्त होत असल्याचे महाराणी अहिल्यादेवी समाज प्रबोधन मंच रत्नागिरी जिल्हाध्यक्ष रामचंद्र बाबू आखाडे यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे जाहीर केले आहे.
धनगर समाजाच्या एस. टी. आरक्षण अंमलबजावणीच्या मागणीकडे महाराष्ट्र सरकारचे सातत्याने होत असलेल्या दुर्लक्षामुळे धनगर समाजाचे नेते दिपकभाऊ बो-हाडे यांचे मुंबईतील ऐतिहासिक आझाद मैदानावर आमरण उपोषण आंदोलन दिनांक १६/३/२०२६ रोजी पासून नेटाने सुरू आहे.
एस. टी. आरक्षणाची अंमलबजावणी व्हावी ही धनगर समाजाची महत्वाची मागणी शासनदरबारी मागील ७० वर्षांपासून प्रलंबित आहे.या मागणीसाठी धनगर समाजाची आजपर्यंत अनेक आंदोलने झाली.प्रत्येकवेळी सरकारने फक्त आश्वासने देऊन धनगर समाजाला वा-यावर सोडले आहे. धनगर आणि धनगड या वादामुळे धनगर समाजाच्या आरक्षणाचा घोळ मागील ७० वर्षे प्रलंबित आहे.घटनेच्या आरक्षण सुचीमध्ये ३६ नंबरला धनगड अशी नोंद आहे.धनगर या शब्दाचा हिंदीमध्ये अनुवाद धनगड असा होतो परंतु अनेक पुरावे देऊनही शासन नेहमीच चालढकल करत आहे.महाराष्ट्रात धनगड नावाची जमात नाही असे महाराष्ट्र शासन कोर्टात प्रतिज्ञापत्र सादर करते परंतु आरक्षण सुचीमध्ये ३६ नंबरला कोणती जमात आहे हे सांगत नाही.महाराष्ट्र राज्याचे विद्यमान मुख्यमंत्री ना. देवेंद्रजी फडणवीस यांनी सन २०१४ मध्ये बारामती येथे माझे सरकार आले तर पहिल्या कॅबिनेटमध्ये धनगर समाजाचे एस. टी. आरक्षण मंजूर करतो असे जाहीर लेखी आश्वासन दिले होते.परंतू १२ वर्षे होऊनही मुख्यमंत्री ना. देवेंद्रजी फडणवीस यांनी आपला शब्द पाळलेला नाही.यामुळे सध्या धनगर समाज महाराष्ट्र शासनाच्या विरोधात लोकशाही मार्गाने उपोषण आंदोलन करत आहे.
उपोषणकर्ते दिपकभाऊ बो-हाडे यांचे दिनांक १६/३/२०२६ रोजी पासून ऐतिहासिक आझाद मैदानावर हजारो धनगर बांधवांच्या उपस्थितीत आमरण उपोषण आंदोलन सुरू आहे.कोकणातील सर्व धनगर समाज बांधवांचा उपोषणकर्ते दिपकभाऊ बो-हाडे यांना जाहीर पाठिंबा असून कोकण विभागातील बहुसंख्य समाज ऐतिहासिक आझाद मैदानावर उपोषणस्थळी ठाण मांडून बसला आहे.महाराष्ट्राच्या विविध भागातील सर्वपक्षीय आमदार आझाद मैदानावर येऊन उपोषणकर्ते दिपकभाऊ बो-हाडे व धनगर समाजाच्या ST आरक्षण मांगणीला जाहीर पाठिंबा देत आहे.काही आमदारांनी विधानसभेत प्रश्न उपस्थित करून शासनाचे धनगर समाजाच्या एस. टी. आरक्षण मागणीकडे लक्ष वेधण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला आहे.परंतू आजपर्यंत कोकण विभागातील एकाही आमदाराने धनगर समाजाच्या ऐतिहासिक आझाद मैदानावर सुरू असलेल्या आमरण उपोषण आंदोलनस्थळी साधी सदिच्छा भेटही दिलेली नाही अथवा विधानसभेत आवाजही उठवला नाही.कोकण विभागातील सर्वपक्षीय आमदारांना धनगर समाजाच्या मतांची आवश्यकता असते परंतु धनगर समाजाच्या जिव्हाळ्याच्या प्रश्नांकडे लक्ष देण्यास त्यांना वेळ नसल्याने कोकण विभागातील धनगर समाजातून प्रचंड नाराजी व्यक्त होत आहे.भविष्यात महाराष्ट्र शासनाने धनगर समाजाचा एस. टी. आरक्षण अंमलबजावणीचा विषय सोडवला नाही तर सत्ताधारी आमदारांना पुढील विधानसभा निवडणुका जड जातील असा इशारा कोकणातील धनगर समाजाच्या वतीने देण्यात येत आहे.
कोकण विभागातील आमदारांचे धनगर समाजाच्या एस. टी. आरक्षण अंमलबजावणी करण्याच्या मागणीकडे दुर्लक्ष !
