चिपळूण : – अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद, शाखा – चिपळूण यांच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या दहा दिवसीय बालनाट्य शिबिराचा समारोप उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. दि. १ ते १० मे दरम्यान आयोजित या शिबिरात सुमारे ५० बालकलाकारांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला.
बेंदरकर आळी येथील माधवबाग सभागृहात पार पडलेल्या या शिबिरामध्ये अभिनय, संवादफेक, शरीरभाषा, रंगमंचावरील हालचाली, स्टेज डेअरिंग, व्यक्तिमत्त्व विकास तसेच समूहात काम करण्याची कला यांचे प्रशिक्षण देण्यात आले. प्रा. रश्मी नंदकुमार देव यांनी मुलांना विविध विषयांवर प्रभावी मार्गदर्शन केले. आदर्श नागरिक घडविण्यासाठी आवश्यक संस्कार व मूल्यांचाही शिबिरामध्ये समावेश करण्यात आला होता.

शिबिरानंतर पालकांनीही समाधान व्यक्त केले. मुलांना रंगमंचावर बोलण्याचे धाडस मिळाले, विविध नाट्यप्रकारांचा अनुभव घेता आला आणि त्यांच्या कलागुणांना योग्य व्यासपीठ मिळाले, अशा भावना पालकांनी व्यक्त केल्या. तसेच असे शिबिर दरवर्षी आयोजित करण्याची अपेक्षाही त्यांनी मांडली.