रायगड : महिलांचे कर्तृत्व, जिद्द, संघर्ष आणि समाजाप्रती असलेले योगदान यांचा गौरव करण्याच्या उद्देशाने हॉटेल एडिशियाच्या वतीने गुरुवार, दि. १५ ऑक्टोबर २०२६ रोजी सायंकाळी 4 वाजता पाली येथे ‘नारी शक्ती सन्मान सोहळा’ आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमास महाराष्ट्र राज्याच्या महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे, रायगडच्या पोलीस अधीक्षक आँचल दलाल, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या उल्का महाजन यांच्यासह विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महिलांचा या सोहळ्यात सन्मान करण्यात येणार आहे. सोमवार दि. (12)रोजी पालीतील पत्रकार परिषदेत प्रसिद्ध संमोहनतज्ज्ञ डॉ. महेश काटे, संमोहनतज्ज्ञ डॉ. आरती काटे यांनी याबाबत माहिती दिली. सदर हा कार्यक्रम श्री बल्लाळेश्वर देवस्थानाजवळील हॉटेल एडिशिया येथे होणार आहे.
हॉटेल एडिशियाचे मालक डॉ. महेश काटे यांनी व्यवसायाबरोबरच सामाजिक बांधिलकी जपण्याचा ध्यास घेतला आहे. केवळ व्यावसायिक दृष्टिकोन न ठेवता समाजाप्रती असलेल्या भावनेतून सामाजिक उपक्रम राबविणे, महिलांना सन्मानाचे व्यासपीठ उपलब्ध करून देणे आणि समाजात सकारात्मक विचार रुजविणे, हे उद्दिष्ट समोर ठेवून त्यांनी विविध उपक्रमांचे आयोजन केले आहे.
यापूर्वी हॉटेल एडिशियाच्या वतीने हळदीकुंकू समारंभ, महिला दिनानिमित्त विशेष कार्यक्रम तसेच महिलांच्या मानसिक आरोग्यविषयक शिबिरांचे आयोजन करण्यात आले आहे. महिलांना एकत्र आणणे, त्यांच्या समस्या आणि भावनांना समजून घेणे, त्यांच्यात आत्मविश्वास निर्माण करणे आणि त्यांच्या सामाजिक सहभागाला प्रोत्साहन देणे, या भूमिकेतून हे उपक्रम राबविण्यात आले आहेत. याच सामाजिक बांधिलकीचा पुढील टप्पा म्हणून ‘नारी शक्ती सन्मान सोहळा’ आयोजित करण्यात आला आहे.
विविध क्षेत्रांतील कर्तृत्ववान महिलांचा गौरव
या सोहळ्यात महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे, रायगडच्या पोलीस अधीक्षक आँचल दलाल, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या उल्का महाजन, प्रसिद्ध स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. राजश्री कटके, जगप्रसिद्ध अंकशास्त्रज्ञ श्वेता जुमानी, शेतकरी कामगार पक्षाच्या राज्य प्रवक्त्या चित्रलेखा पाटील, शेकाप महिला आघाडी प्रमुख ऍड. मानसी ताई म्हात्रे,
क्रेया संस्थेच्या संचालिका स्वप्निता उपेंद्र गिरी, भाजप महिला मोर्चाच्या अध्यक्षा चित्राताई पाटील, माजी जिल्हा परिषद अध्यक्षा नीलिमा धैर्यशील पाटील, पेण येथील अहिल्या महिला मंडळाच्या अध्यक्षा अश्विनी गाडगीळ, अलिबागच्या नगराध्यक्षा अक्षया नाईक, समाजसेविका वर्षा राजेश मोरे, आंतर राष्ट्रीय कराटे प्रशिक्षक शीतल गायकवाड, नागावच्या सरपंच हर्षदा मयेकर, नगराध्यक्षा वनश्री समीर शेडगे, कृषिकन्या रसिका फाटक, अल्पवयात गिर्यारोहण क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या शर्मिका म्हात्रे आणि अल्पवयात जलतरण क्षेत्रात कामगिरी करणाऱ्या सारा वर्तक यांचा सन्मान करण्यात येणार आहे.
प्रशासन, पोलीस सेवा, सामाजिक कार्य, आरोग्य, महिला संघटन, स्थानिक स्वराज्य संस्था, कृषी, गिर्यारोहण आणि जलतरण अशा विविध क्षेत्रांमध्ये महिलांनी स्वतःच्या कर्तृत्वाचा ठसा उमटविला आहे. त्यांच्या कार्याची दखल घेऊन त्यांचा गौरव करणे, ही या सोहळ्यामागील प्रमुख संकल्पना आहे.
महिलांच्या कर्तृत्वातून समाजाला प्रेरणा
महिला या केवळ कुटुंबाचा आधार नसून समाजाच्या प्रगतीतील महत्त्वपूर्ण शक्ती आहेत. अनेक अडचणींवर मात करत स्वतःचे वेगळे स्थान निर्माण करणाऱ्या महिलांच्या कार्याची समाजाने दखल घेणे आवश्यक आहे. त्यांच्या यशोगाथा नव्या पिढीसमोर आल्यास मुलींना स्वतःची स्वप्ने पूर्ण करण्याची प्रेरणा मिळेल आणि महिलांच्या क्षमतेविषयी समाजात अधिक सकारात्मक दृष्टिकोन निर्माण होईल.
महिलांचा सन्मान म्हणजे त्यांच्या संघर्षाचा, आत्मविश्वासाचा आणि समाजासाठी दिलेल्या योगदानाचा गौरव होय. हीच भावना केंद्रस्थानी ठेवून हॉटेल एडिशियाच्या वतीने या सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.
व्यवसायातून आर्थिक प्रगती साधतानाच समाजासाठी काहीतरी योगदान देणे, हीदेखील सामाजिक जबाबदारी आहे. डॉ. महेश काटे यांच्या पुढाकारातून आयोजित करण्यात येणारा हा सोहळा पाली परिसरातील सामाजिक आणि सांस्कृतिक उपक्रमांमध्ये एक महत्त्वपूर्ण उपक्रम ठरण्याची अपेक्षा आहे.