चिपळूण (विशेष प्रतिनिधी) : चिपळूण नगरपालिकेची सध्याची मुख्य प्रशासकीय इमारत जमीनदोस्त करून त्या ठिकाणी नवीन, अत्याधुनिक आणि सुसज्ज प्रशासकीय इमारत बांधण्यात येणार आहे. त्याकरिता मुख्य इमारतीमधील सर्व विभाग आणि दालने सोमवार, दि. १२ ऑक्टोबर २०२६ पासून इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्र आणि हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे एल टाईप शॉपिंग सेंटर येथे स्थलांतरित करण्यात आली आहेत.

त्यापैकी नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष, सर्व सभापती, मुख्याधिकारी, उपमुख्याधिकारी, प्रशासकीय अधिकारी आणि कार्यालयीन अधीक्षक यांची स्वतंत्र दालने सांस्कृतिक केंद्रात असणार आहेत. त्याचबरोबर आस्थापना विभाग, सभा विभाग, लेखा विभाग, बांधकाम विभाग, रचना विभाग आणि संगणक विभाग या सर्व विभागांचे कामकाज सांस्कृतिक केंद्रातून चालविण्यात येणार आहे.

तर हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे एल टाईप शॉपिंग सेंटर या इमारतीमधून नागरी सुविधा केंद्र, मालमत्ता विभाग, विधी व न्याय विभाग, विवाह नोंदणी विभाग, पाणीपुरवठा विभाग, उद्यान विभाग, अग्निशमन विभाग, अभिलेख व भांडार विभाग, वसुली विभाग आणि NULM विभाग हे विभाग कार्यरत झाले आहेत.

या संदर्भात सागर वेव्हच्या टीमने आढावा घेतला असता, शहराच्या विकासकामांना गती देणारा बांधकाम विभाग आणि रचना विभाग सांस्कृतिक केंद्राच्या छतावर हलविण्यात आल्याचे निदर्शनास आले. मात्र, चिपळूणमधील भयंकर उष्म्यामुळे तप्त पत्र्याखाली हे कर्मचारी काम कसे करणार, असा सवाल उपस्थित होत आहे. या संदर्भात बांधकाम सभापती कपिल शिर्के यांनी दैनिक सागरला सांगितले की, उष्णतेचा त्रास कमी करण्यासाठी आम्ही फोम शीट आणि कौले टाकणार आहोत. मात्र, त्याचा काहीही उपयोग होणार नाही, अशी चर्चा ऐकायला मिळाली.