चिपळूण : चिपळूण तालुक्यातील सुसज्ज आणि नावलौकिक प्राप्त ग्रामपंचायतींपैकी एक असलेल्या मुंढे ग्रामपंचायतीच्या नूतन इमारतीचा उद्घाटन सोहळा उत्साहात पार पडला. या इमारतीचे बांधकाम अत्यंत सुंदर व घरासारख्या आपुलकीच्या भावनेतून करण्यात आले असून, ग्रामपंचायतीने उभारलेल्या या वास्तूचे आमदार शेखरजी निकम यांनी विशेष कौतुक केले.
यावेळी बोलताना आमदार शेखर निकम म्हणाले की, मुंढे ग्रामपंचायतीची ही इमारत पाहून मनापासून आनंद झाला. आपल्या घरासारखी सुंदर आणि सुसज्ज इमारत उभारण्याचे काम ग्रामपंचायतीने केले आहे. या इमारतीमुळे ग्रामस्थांना एक चांगली सुविधा उपलब्ध झाली असून, भविष्यात या ठिकाणी विविध शासकीय शिबिरे, उपक्रम आणि लोकाभिमुख कार्यक्रम आयोजित करता येतील.
या इमारतीसाठी जागा उपलब्ध करून दिल्याबद्दल जाधव कुटुंबीयांचे त्यांनी मनापासून आभार मानले. गावाच्या विकासासाठी जमीन देऊन त्यांनी केलेले योगदान महत्त्वपूर्ण असल्याचेही त्यांनी नमूद केले.
स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या माध्यमातून मतदारसंघात मोठ्या प्रमाणावर विकासकामे झाली आहेत. आज त्यांच्या जाण्याने निर्माण झालेली उणीव प्रकर्षाने जाणवत आहे. मात्र, त्यांनी दाखविलेल्या विकासाच्या मार्गावर आपण सर्वांनी एकत्रितपणे पुढे जाणे आवश्यक आहे, अशी भावना आमदार निकम यांनी व्यक्त केली.
सरपंच मयूर खेतले यांच्या कामाचे कौतुक
मुंढे ग्रामपंचायतीचे सरपंच मयूर खेतले यांनी ग्रामपंचायतीच्या माध्यमातून चांगले काम केले असून, गावाच्या विकासासाठी घेतलेले त्यांचे प्रयत्न कौतुकास्पद आहेत, असे आमदार शेखर निकम यांनी सांगितले.
तसेच पंचायत समितीचे सभापती सूर्यकांत खेतले हे सभापती म्हणून अत्यंत चांगल्या पद्धतीने काम करीत असून, ग्रामीण भागातील विकासकामांसाठी त्यांची असलेली तळमळ महत्त्वपूर्ण असल्याचेही त्यांनी नमूद केले.
मुंढे गावासाठी निधीची कमतरता भासू देणार नाही – सभापती सूर्यकांत खेतले
यावेळी पंचायत समितीचे सभापती सूर्यकांत खेतले म्हणाले की, आमदार शेखर निकम यांनी मुंढे गावासाठी आवश्यकतेनुसार निधी उपलब्ध करून दिला आहे. विशेषतः गावातील पिण्याच्या पाण्याच्या प्रश्नासह विविध विकासकामांसाठी त्यांनी सातत्याने सहकार्य केले आहे.
गावाच्या सर्वांगीण विकासासाठी आमदार शेखर निकम यांचे मार्गदर्शन आणि सहकार्य लाभत असून, त्यांच्या माध्यमातून मुंढे गावात अनेक विकासकामे मार्गी लागली आहेत. भविष्यातही गावाच्या गरजेनुसार विकासकामे करण्यासाठी प्रयत्नशील राहणार असल्याचे त्यांनी सांगितले.
विविध मान्यवरांकडून विकासकामांचे कौतुक
यावेळी उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे तालुकाध्यक्ष बळीराम गुजर यांनी आमदार शेखर निकम यांच्या विकासकामांचे कौतुक केले. ग्रामीण भागातील विकासासाठी आमदारांनी दिलेले योगदान महत्त्वपूर्ण असून, मुंढे ग्रामपंचायतीची नूतन इमारत ही गावाच्या प्रगतीचे प्रतीक असल्याचे त्यांनी नमूद केले.
राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष नितीन ठसाळे यांनीही ग्रामपंचायतीच्या सुसज्ज इमारतीचे आणि आमदार शेखर निकम यांच्या विकासाभिमुख कार्याचे कौतुक केले. अशा सुविधा निर्माण झाल्यामुळे ग्रामस्थांना शासकीय कामकाजासाठी अधिक चांगल्या सोयी उपलब्ध होणार असून, गावाच्या विकासाला नवी दिशा मिळेल, अशी भावना त्यांनी व्यक्त केली.
मुंढे ग्रामपंचायतीच्या नूतन इमारतीमुळे ग्रामस्थांना एक सुसज्ज, सुंदर आणि प्रशस्त सुविधा उपलब्ध झाली असून, भविष्यात या वास्तूच्या माध्यमातून विविध शासकीय योजना, आरोग्य शिबिरे, ग्रामसभा आणि सामाजिक उपक्रम राबविण्यास मदत होणार आहे. ग्रामपंचायतीच्या या नव्या वास्तूमुळे मुंढे गावाच्या विकासप्रवासात आणखी एक महत्त्वपूर्ण टप्पा गाठला गेला आहे. यावेळी
सूर्यकांत खेतले सभापती पंचायत समिती, दादासाहेब साळवी, तालुकाध्यक्ष नितीन ठसाळे, सौ उमा पाटील गट विकास अधिकारी, मयूर खेतले, शाम खेतले, सखाराम गायकवाड, श्रीपाद खेतले, तंटामुक्ती अध्यक्ष मुंडे, प्रकाश आरवट, अमोल मस्के साहेब अभियंता शिरगाव, सिताराम खेतले,शिवाजी खेतले, रवींद्र खेतले,शैलेश चव्हाण, विजय मोहिते, अनिल शिंदे, प्रवीण सावंत,प्रवीण सावंत, रुपेश खेतले, प्रशांत महाडिक आदी मान्यवर उपस्थित होते.
मुंढे ग्रामपंचायतीच्या नूतन इमारतीचे आमदार शेखर निकम यांच्या हस्ते उद्घाटन…
