खेड : – कुणबी समाजातील अनिष्ट प्रथा, कालबाह्य रूढी तसेच विवाह व विविध सामाजिक कार्यक्रमांमधील अनावश्यक आणि अवाजवी खर्चाला आळा घालण्यासाठी लवेल विभागाची सभा उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली. समाजाच्या सर्वांगीण प्रगतीसाठी सकारात्मक व विधायक बदल घडवून आणण्याचा निर्धार यावेळी समाजबांधवांनी व्यक्त केला.
कुणबी समाजोन्नती संघ मुंबई या मातृसंस्थेच्या माध्यमातून कुणबी समाजोन्नती खेड मुंबई व ग्रामीण, कुणबी युवा खेड तसेच कुणबी महिला खेड यांच्या संयुक्त विद्यमाने कुणबी समाज परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. या परिषदेत समाजातील विविध अनिष्ट प्रथा व परंपरा तसेच लग्नसमारंभ, धार्मिक व सामाजिक कार्यक्रमांमध्ये होणाऱ्या अनावश्यक खर्चाबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली होती. समाजाच्या प्रगतीच्या दृष्टीने विविध ठोस निर्णय व ठरावही मांडण्यात आले होते. या ठरावांची अंमलबजावणी केवळ परिषद किंवा बैठकीपुरती मर्यादित न राहता ती तळागाळापर्यंत पोहोचावी, या उद्देशाने विभागनिहाय सभा घेऊन समाजबांधवांमध्ये जनजागृती करण्यात येत आहे. त्याचाच एक भाग म्हणून लवेल विभागाची सभा घेण्यात आली. सभेत विवाह सोहळे, सामाजिक कार्यक्रम आणि विविध समारंभांमध्ये वाढत चाललेल्या खर्चामुळे सर्वसामान्य कुटुंबांवर पडणाऱ्या आर्थिक भाराबाबत चर्चा झाली. केवळ सामाजिक प्रतिष्ठेसाठी होणारा अनावश्यक खर्च टाळून साधेपणा, बचत आणि विधायक विचारांना प्राधान्य देण्याची गरज समाजबांधवांनी व्यक्त केली. याशिवाय तरुण पिढीला शिक्षण, रोजगार, व्यवसाय व स्पर्धा परीक्षांसह विविध क्षेत्रांत पुढे जाण्यासाठी प्रोत्साहन देणे, महिलांचा सामाजिक व आर्थिक सहभाग वाढविणे तसेच समाजातील एकोपा अधिक मजबूत करण्याबाबतही चर्चा करण्यात आली.समाजात सकारात्मक परिवर्तन घडवून आणण्यासाठी केवळ ठराव करून चालणार नसून प्रत्येक समाजबांधवाने त्याच्या अंमलबजावणीची जबाबदारी स्वीकारणे आवश्यक असल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली. अनिष्ट प्रथा व कालबाह्य रूढींना फाटा देत समाजाच्या सामाजिक, शैक्षणिक आणि आर्थिक प्रगतीला चालना देण्याचा निर्धार सभेत करण्यात आला.
लवेल विभागातील विविध गावांमधील समाजबांधव मोठ्या संख्येने सभेला उपस्थित होते. समाजहितासाठी सुरू करण्यात आलेल्या या अभियानाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून, समाजातील विविध घटकांना एकत्र आणून परिवर्तनाची चळवळ पुढे नेण्याचा प्रयत्न केला जात आहे.
अनावश्यक खर्चाला आळा घालून भविष्यातील पिढीच्या शिक्षणासाठी, रोजगारासाठी आणि प्रगतीसाठी उपलब्ध संसाधनांचा योग्य वापर करण्याचा संदेश या सभेतून देण्यात आला. कुणबी समाजोन्नती संघ मुंबईच्या मार्गदर्शनाखाली सुरू असलेल्या विभागनिहाय सभांमुळे ७ जूनच्या कुणबी समाज परिषदेतील ठरावांची प्रभावी अंमलबजावणी तळागाळापर्यंत पोहोचण्यास मदत होणार असून, लवेल विभागाची सभा समाजपरिवर्तनाच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण ठरली.
कुणबी समाजातील अनिष्ट प्रथा, अवाजवी खर्चाला आळा घालण्याचा लवेल विभागाचा निर्धार!
