खेड : कोकणातील भातशेतीवर पावसाच्या खंडाचे संकट निर्माण झाले असून, भातपीक वाढीच्या तसेच लोंबी धरण्याच्या अवस्थेत असताना पावसाने दडी मारल्याने शेतकरी चिंतेत आहेत. राज्यातील २६५ तालुक्यांमध्ये दुष्काळसदृश परिस्थितीचा आढावा घेण्याचे निर्देश कृषी विभागाला देण्यात आले आहेत. मात्र रत्नागिरी जिल्ह्यातील केवळ रत्नागिरी, संगमेश्वर आणि राजापूर या तीन तालुक्यांचा या प्राथमिक आढाव्यात समावेश करण्यात आला आहे.
उत्तर रत्नागिरीतील खेड, चिपळूण, दापोली आणि मंडणगड तालुक्यांतही गेल्या काही काळापासून पावसाचा खंड पडला आहे. त्यामुळे भातशेतीला मोठा फटका बसण्याची शक्यता शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे. सध्या हळवी आणि गरवा भाताची पिके वाढीच्या महत्त्वाच्या टप्प्यात असून, लोंबी धरण्यासाठी पावसाची नितांत आवश्यकता आहे. पाऊस लांबला तर भातपिकाच्या उत्पादनावर परिणाम होण्याची शक्यता आहे. त्यामुळे उत्तर रत्नागिरीतील शेतीची प्रत्यक्ष पाहणी करून परिस्थितीचा तातडीने आढावा घ्यावा आणि आवश्यक ती मदत उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे.
राज्याच्या कृषी विभागाकडून २६५ तालुक्यांमध्ये दुष्काळसदृश परिस्थितीचा प्राथमिक आढावा घेण्यास सुरुवात झाली आहे. मात्र या यादीत उत्तर रत्नागिरीतील तालुक्यांचा समावेश नसल्याने शेतकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. “खेड, दापोली आणि मंडणगड तालुक्यातील शेतकऱ्यांकडेही कणकवली किंवा चिपळूण भागातील शेतकऱ्यांप्रमाणेच शासनाने लक्ष द्यावे. या भागातील शेतीची प्रत्यक्ष पाहणी करून शेतकऱ्यांना जास्तीत जास्त मदत मिळावी,” अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.
गेल्या काही आठवड्यांपासून पावसाने दडी मारल्याने भातपिकाला आवश्यक असलेले पाणी मिळत नसल्याची स्थिती आहे. सध्या शेती चांगली दिसत असली तरी पुढील काळात पाऊस न झाल्यास मोठ्या नुकसानीची शक्यता आहे. त्यामुळे कृषी विभागाने परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन उत्तर रत्नागिरीतील भातशेतीची तातडीने पाहणी करावी, अशी मागणी जोर धरत आहे.