चिपळूण : गुजरातमधील अहमदाबाद येथे आयोजित जागतिक योगासन स्पर्धेत ७८ देशांतील स्पर्धकांना मागे टाकत खेड तालुक्यातील लोटेमाळ गावची सुकन्या कु. तन्वी चैताली भूषण रेडीज हिने सुवर्णपदक पटकावून भारताचा तिरंगा जागतिक स्तरावर अभिमानाने फडकविला.

या उल्लेखनीय आणि ऐतिहासिक यशाबद्दल चिपळूण तालुका वैश्य नागरी सहकारी पतसंस्था, चिपळूण यांच्या वतीने कु. तन्वी हिचा पुष्पगुच्छ, शाल, सन्मानचिन्ह आणि रोख रक्कम देऊन गौरव करण्यात आला.

यावेळी संस्थेचे चेअरमन श्री. राजाराम एकनाथ शिरगावकर (हेमंत) यांनी तन्वीचे अभिनंदन करताना सांगितले, “जिद्द, शिस्त, कठोर परिश्रम आणि आत्मविश्वास यांच्या जोरावर कोणतेही ध्येय गाठता येते. तन्वीने आपल्या यशातून हे सिद्ध करून दाखविले असून, तिचा हा गौरव संपूर्ण खेड तालुका, रत्नागिरी जिल्हा आणि महाराष्ट्रासाठी अभिमानाची बाब आहे.”

या सत्कार समारंभास संस्थेचे व्हाइस चेअरमन श्री. तुषार सूर्यकांत रेडीज, संचालक मंडळातील सर्व सदस्य तसेच कर्मचारीवर्ग उपस्थित होते. उपस्थितांनी कु. तन्वी हिच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा देत तिच्या पुढील वाटचालीसही मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या.