चिपळूण, ता. ३ : वालावलकर रुग्णालयाच्या नवजात शिशु अतिदक्षता विभागात अकाली जन्मलेल्या व जन्मानंतर गंभीर श्वासोच्छ्वासाच्या अडचणी (Birth Asphyxia) असलेल्या एका नवजात बालिकेवर यशस्वी उपचार करून तिला निरोगी अवस्थेत घरी पाठविण्यात आले.
सौ. अश्विनी मोहिते यांच्या पोटी ३६ आठवड्यांच्या गर्भावधीत जन्मलेली ही बालिका बी. के. एल. वालावलकर रुग्णालयात जन्माला आली. जन्मानंतर बाळाने त्वरित रडणे सुरू केले नाही व श्वसनास त्रास जाणवत असल्याने तिला तातडीने नवजात अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आले. प्रारंभी बाळाला श्वसनासाठी आवश्यक पुनर्जीवन उपचार (Resuscitation), व्हेंटिलेटर सहाय्य व सर्फक्टंट थेरपी देण्यात आली.
उपचारादरम्यान बाळामध्ये संसर्गाची लक्षणे दिसून आल्याने आवश्यक रक्त तपासण्या करून तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली प्रतिजैविके देण्यात आली. तसेच कावीळ व प्लेटलेट्स कमी होण्याची समस्या निर्माण झाल्याने फोटोथेरपी, प्लेटलेट ट्रान्सफ्युजन आणि इतर आवश्यक उपचार करण्यात आले. रक्तसंस्कृती तपासणीत संसर्गाचे निदान झाल्यानंतर संवेदनशीलतेनुसार औषधोपचार यशस्वीपणे पूर्ण करण्यात आले.
या यशस्वी उपचारामुळे बी. के. एल. वालावलकर रुग्णालयाच्या नवजात अतिदक्षता विभागातील अत्याधुनिक सुविधा व तज्ज्ञ डॉक्टरांच्या समन्वित कार्याचा पुन्हा एकदा प्रत्यय आला आहे. रुग्णालय प्रशासनाने उपचार प्रक्रियेत सहभागी सर्व वैद्यकीय अधिकारी, परिचारिका व कर्मचाऱ्यांचे अभिनंदन केले आहे.
